पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत या हल्ल्यामागे हात असलेल्या पाकिस्तानला जबर घडा शिकवला होता. भारतीय सैन्यदलांनी या कारवाईदरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नांना प्रत्युत्तर देताना पाकिस्तानमधील ११ हवाईतळांना लक्ष्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानबाबत मोठं विधान केलं आहे. पाकिस्तानची ७५ वर्षे जगून झाली आहेत, आता त्यांचे फारसे दिवस उरलेले नाहीत असे योगी म्हणाले.
आज योगी आदित्यनाथ हे अयोध्येच्या दौऱ्यावर आले होते. तिथे त्यांनी हनुमानगढी येथील श्री हनुमत कथा मंडपाचं उदघाटन केलं. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात संबोधित करताना योगी म्हणाले की, पाकिस्तान आता फार दिवस टिकणार नाही. तिथला दहशतवाद एकेदिवशी पाकिस्तानला बुडवेल. पाकिस्तानची ७५ वर्षे जगून झाली आहेत. आता त्यांच्याकडे फारसे दिवस उरलेले नाहीत, त्यांचा अंत जवळ आला आहे, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरचं कौतुक करताना योगी म्हणाले की, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आमच्या निर्दोष नागरिकांना धर्म विचारून मारलं. त्यानंतर भारताच्या शूर सैनिकांनी प्रत्युत्तरदाखल कारवाई करत, २६ च्या बदल्यात १२४ दहशतवाद्यांना ठार मारलं.
यावेळी योगी आदित्यनाथ यांनी दहशतवाद्यांना सक्त इशारा देताना सांगितले की, हा नवा भारत आहे, जो मुद्दाम कुणाच्या वाटेला जात नाही. मात्र जर कुणी कळ काढली तर त्याला सोडतही नाही. आमच्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावला. तर आपल्या सुरक्षा दलांनी पाकिस्तानचं जबर नुकसान केलं, असेही ते म्हणाले.