अवघ्या २३ मिनिटात झालं 'ऑपरेशन सिंदूर'; भारताचे नुकसान झाल्याचे छायाचित्रे दाखवा - अजित डोवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 07:50 IST2025-07-12T07:50:17+5:302025-07-12T07:50:38+5:30
आयआयटी पदवीदान सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांचे विदेशी माध्यमांना आव्हान

अवघ्या २३ मिनिटात झालं 'ऑपरेशन सिंदूर'; भारताचे नुकसान झाल्याचे छायाचित्रे दाखवा - अजित डोवाल
चेन्नई : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ भारताने अचूक हल्ले करून नष्ट केले. त्यानंतर भारतात काडीचे जरी नुकसान झाले असेल तर ते दर्शविणारी छायाचित्रे आम्हाला दाखवा, असे आव्हान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी विदेशी प्रसारमाध्यमांना शुक्रवारी दिले.
चेन्नईतील आयआयटी मद्रासच्या ६२व्या पदवीप्रदान समारंभात त्यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’सह अन्य विदेशी प्रसारमाध्यमांची नावे घेऊन टीका केली. यासह परदेशी माध्यमांचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, पाकिस्तानातील सरगोधा, रहिम यार खान, चकलाला, रावळपिंडी इत्यादी ठिकाणी असलेल्या १३ हवाई तळांचे भारताच्या हल्ल्यामुळे जे नुकसान झाले, त्याची छायाचित्रे माध्यमांनी दाखविली. मात्र, भारतात असे काही नुकसान झाले, असे एकही छायाचित्र विदेशी प्रसारमाध्यमांना दाखविता आले नाही.
‘ऑपरेशन सिंदूरमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर’
डोवाल यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. ब्राह्मोस क्षेपणास्त्र, हवाई नियंत्रण आणि कमांड सिस्टिम आदी यंत्रणांनी परिणामकारक कामगिरी केली. नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. हे तळ सीमेजवळ नव्हे, तर पाकच्या अंतर्भागात होते. त्या प्रत्येक लक्ष्यावर भारताने अचूक हल्ला केला.
ऑपरेशन सिंदूर अवघ्या २३ मिनिटांत पूर्ण झाले
ऑपरेशन सिंदूर अवघ्या २३ मिनिटांत पूर्ण झाले. या कारवाईबद्दल आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी त्यांच्या मतानुसार लिहिले. मात्र, उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे खरी गोष्ट सांगतात. १० मेपूर्वी आणि त्यानंतर पाकमधील १३ हवाई तळांची परिस्थिती काय होती, हे या छायाचित्रांवरून नीट कळते.
‘भारताने अडीच वर्षांत ५-जी केले विकसित’
अजित डोवाल यांनी सांगितले की, युद्ध आणि तंत्रज्ञान यांचा परस्पर संबंध खूप महत्त्वाचा आहे. देशाने आपली गरज भागवण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे. आयआयटी मद्रास व खासगी क्षेत्राने ५-जी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मोठे योगदान दिले. भारताने अवघ्या अडीच वर्षांत ५जी विकसित केले. त्यासाठी चीनने १२ वर्षे घेतली व ३०० अब्ज डॉलर खर्च केले.