पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:36 IST2025-05-14T08:35:19+5:302025-05-14T08:36:39+5:30
India vs Pakistan, Turkey: जेव्हा तुर्कीत भूकंप झालेला तेव्हा भारताने सर्वात मोठी मदत पाठविली होती, हे उपकार तुर्की विसरला आणि शत्रूला मदत करत भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. यामुळे आता भारतीय जनतेत संतापाची लाट आहे.

पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतप भारताने पाकिस्तानवर हल्ला केला, तेव्हा तुर्कीने पाकिस्तानला लष्करी विमाने भरून भरून ड्रोन, शस्त्रास्त्रे पाठविली होती. जेव्हा तुर्कीत भूकंप झालेला तेव्हा भारताने सर्वात मोठी मदत पाठविली होती, हे उपकार तुर्की विसरला आणि शत्रूला मदत करत भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. यामुळे आता भारतीय जनतेत संतापाची लाट आहे. तुर्कीने पाकिस्तानचे समर्थन केल्याने आता तुर्कीविरोधात देशभरात 'बॉयकॉट तुर्की' अभियान सुरु झाले आहे. तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची घोषणा झाली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेनुसार पुण्याच्या व्यापाऱ्यांनी तुर्कीतून आयात केले जाणारे सफरचंद आणणे बंद केले आहे. यामुळे स्थानिक बाजारातून सफरचंद गायब झाले आहेत. ग्राहकांना अद्याप हे सफरचंद काश्मीरमधून येतातय की तुर्कीतून याची माहिती नव्हती, परंतू आता होऊ लागली आहे. पुण्यात जवळपास १००० ते १२०० कोटींची उलाढाल होते, ती थांबविण्यात आली आहे.
पुण्याचे व्यापारी तुर्कीऐवजी आता इराण, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथून हा माल मागवत आहेत. तुर्कीकडून माल मागविणे थांबविल्याचे व्यापारी सय्योग झेंडे यांनी सांगितले आहे. तसेच अन्य एका व्यापाऱ्यानुसार तुर्कीच्या सफरचंदांची मागणी ५० टक्क्यांनी घटली असल्याचे सांगितले. ग्राहक आता उघडपणे या सफरचंदांवर बहिष्कार घालत आहेत.
एवढेच नाही तर उदयपूरमध्ये देखील मार्बल व्यापाऱ्यांनी तुर्कीवरून मार्बल मागविणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत तुर्की पाकिस्तानला पाठिंबा देत राहील, तोपर्यंत त्याच्याशी व्यापार केला जाणार नाही, असे दयापूर मार्बल प्रोसेसर्स कमिटीचे अध्यक्ष कपिल सुराणा यांनी सांगितले. भारतात आयात होणाऱ्या एकूण संगमरवरीपैकी सुमारे ७०% तुर्कीमधून येते, असे ते म्हणाले. देशभरातील सर्व संगमरवरी संघटनांनी तुर्कीसोबत व्यवसाय थांबवला तर जागतिक स्तरावर एक मजबूत संदेश जाईल, असेही आवाहन त्यांनी केले आहे.