ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 04:04 IST2025-05-12T04:04:17+5:302025-05-12T04:04:17+5:30
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याच्या लष्कराच्या विधानामुळे ही भीती कायम आहे.

ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : शनिवारी रात्री ११ वाजल्यानंतर केंद्रशासित प्रदेशात शांतता परतली आणि रविवारी कोणत्याही नवीन गोळीबाराचे किंवा ड्रोन घुसखोरी न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, येथे युद्धाच्या भीतीचे वातावरण कायम आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याच्या लष्कराच्या विधानामुळे ही भीती कायम आहे.
उरीमधील कमलकोट येथील रहिवासी मुनीर हुसेन म्हणाले की, शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री नियंत्रण रेषेला लागून असलेल्या या गावात आणि त्यांच्या आसपासच्या भागात शांतता होती. पण, त्यांना अजूनही बंकरमधून बाहेर पडण्याचे धाडस करता आलेले नाही.निवृत्त लष्करी कर्मचारी हुसेन म्हणाले की, शेवटचे काही दिवस मोठ्या संकटासारखे होते.
१९९९ च्या (भारत-पाकिस्तान) युद्धादरम्यानही इतका गोळीबार पाहिला नव्हता. मला आशा आहे की शांतता नांदू लागेल. मात्र, युद्धबंदी लागू असली तरी, जम्मूमध्ये तणाव कायम आहे. संशयित दहशतवाद्यांनी नगरोटा परिसरातील लष्कराच्या १६ व्या कॉर्प्स मुख्यालयावर गोळीबार केला असून, यात एक सैनिक जखमी झाला आहे.
पाकच्या गोळीबारात २२ नागरिकांचा मृत्यू
भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांना गोळीबाराचा सर्वाधिक फटका बसला. यात किमान २२ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे.
काश्मीरमध्ये आणखी हल्ले होणार? : काश्मीरमध्ये आणखी हल्ले होण्याची शक्यता असल्याच्या अफवांना उधाण आले. युद्धबंदीचा फायदा घेत सीमा ओलांडण्यात अनेक दहतशवादी यशस्वी झाल्याचेही समोर येत आहे.
नागरिक म्हणतात…
जम्मू शहरातील नागरिकांना रात्रभर नीट झोप लागली नाही. आता क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ले होणार नाहीत हे लहान मुलांना समजावून सांगताना पालकांना नाकीनऊ आले. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांना तोंड देणाऱ्या जम्मूच्या लोकांनी कधीही बंकर उभारले नाहीत. पुंछ येथील रहिवासी मुर्तजा अली यांनी सांगितले की, आता पूर्ण शांतता आहे. पण, पाकिस्तानवर विश्वास ठेवता येत नाही, म्हणूनच मला रात्रभर झोप लागली नाही.
रात्रभर संभ्रम; सकाळी जनजीवन सुरळीत
जयपूर : युद्धबंदी जाहीर झाल्यांनतर राजस्थानच्या सीमा भागात संभ्रम आणि अनिश्चिततेचे वातावरण होते. मात्र, रविवारी सकाळपासून सर्वत्र जनजीवन सुरळीत झाले. उत्तर-पश्चिम रेल्वेने सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. रविवारी रद्द झालेल्या १६ गाड्या पुन्हा सुरू केल्या.
अनेक भागांत क्षेपणास्त्रासारखे अवशेष
राज्याच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये अनेक भागांत रविवारी पडलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या आकाराचे अवशेष सापडले. मात्र, युद्धबंदी जाहीर झालेली असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण नव्हते. नंतर रविवारी दिवसभर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आले.
पंजाबमध्येही शांतता
शनिवारी रात्रीपासून पाकिस्तानलगत असलेल्या पंजाबच्या सीमेवरही शांतता आहे. संवेदनशील अमृतसर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सर्व व्यवहार नियमितपणे चालू ठेवण्याच्या सूचना केल्या.