- चंद्रशेखर बर्वे लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी संघटनांच्या तळांना अवघ्या अर्ध्या तासात भुईसपाट करीत भारताच्या लष्कराने पहलगाम हल्ल्याचा हिशेब चुकता केला. या हल्ल्यात लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे नऊ तळ बेचिराख झाले.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करीत भारतीय लष्कराने बुधवारी पहाटे एक ते दीडच्या सुमारास राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देशाला दिली.
देशाच्या इतिहासात प्रथमच सशस्त्र दलातील दोन महिला अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित केले. यातून भारताच्या लष्करी सामर्थ्यातील नारीशक्तीचे आणि सर्वधर्मसमभावाचेही दर्शन अवघ्या जगाला घडले.
दहशतवाद्यांचे फोन टॅप करून हल्ल्यासाठी निवडले तळ लष्कराने गुप्तचर संस्थांकडून मिळत असलेली अद्ययावत माहिती, सॅटेलाइटहून मिळविलेले फोटो आणि दहशतवाद्यांचे फोन टॅप करून या तळांची हल्ल्यासाठी निवड केली.‘ऑपरेशन सिंदूर’ लष्कर, हवाई दल आणि नौदलाची संयुक्त मोहीम होती. यात हवेतून लाँच होणारी स्क्लॅप क्रूज मिसाईल, हॅमर गाईडेड बॉम्ब आणि लॉयटरिंग मुनिशंसचा वापर केला गेला. लॉयटरिंग मुनिशंस दिसायला ड्रोनसारखे असते. मात्र, काम मिसाईलचे करते. यास कॉमीकेज ड्रोनसुद्धा म्हणतात.
वायुसेनेच्या विमानांनी भारतीय सीमेत राहून क्षेपणास्त्रांचा मारा केला. स्क्लॅप मिसाईलचा बंकर आणि कमांड पोस्टसह कठोर टार्गेटवर मारा केला गेला. हॅमर गाईडेड बॉम्बचा वापर बहुमजली इमारतींवर करण्यात आला.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हल्ल्यानंतर लगेच अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांना माहिती दिली, असे वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने निवेदनात म्हटले आहे.
स्वसुरक्षेच्या अबाधित हक्कासाठी भारताने केली लष्करी कारवाई
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, भारतीय गुप्तचर संस्थांनी सीमेपलीकडून आणखी घुसखोरी होण्याची आणि दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची योजना आखली जात असल्याची सूचना दिली होती. अशात, स्वसुरक्षेच्या अबाधित हक्काचा उपयोग करीत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी तळांवर लष्करी कारवाई केली. दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई मारा करताना पाकचे लष्कर आणि सामान्य माणसांना इजा पोहोचणार नाही, याची पुरेपूर काळजी भारतीय लष्कराने घेतली होती, असेही त्यांनी सांगितले.
कसाब आणि हेडलीने जिथे प्रशिक्षण घेतले ती ठिकाणेही केली उद्ध्वस्त
कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवाद्यांचे ९ तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. ही कारवाई पहाटे १ ते १:३० अशी २५ मिनिटे चालली. यात दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे आणि लाँच पॅडसह अजमल कसाब आणि हेडलीने जेथे प्रशिक्षण घेतले होते, ती ठिकाणेही उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.