...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 09:28 IST2025-05-12T09:27:43+5:302025-05-12T09:28:35+5:30
India Pakistan War: भारतीय लष्कराने सांगितले की ७ मे ते १० मे दरम्यान नियंत्रण रेषेवर ३५-४० पाकिस्तानी सैन्य सैनिक मारले गेले. नऊ दहशतवादी अड्ड्यांवर झालेल्या हल्ल्यात १०० दहशतवादी मारले गेले. यामध्ये पुलवामा हल्लेखोर आणि IC-814 चे अपहरणकर्ते यांचा समावेश होता.

...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
पाकिस्तानने अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारतासोबत शस्त्रसंधी करण्याची ऑफर दिली. भारताने ती स्वीकारली, परंतू त्याच सायंकाळी अंधार पडताच पाकिस्तानने पुन्हा दगाबाजी करत ड्रोन हल्ले केले. यानंतरची रविवारची रात्र शांततेत गेली आहे. यामागचे कारण समोर आले आहे. शस्त्रसंधीची चर्चा करणाऱ्या पाकिस्तानच्या डीजीएमओला आज भारताशी चर्चा करायची आहे. यामुळे जर आज हल्ला केला तर चर्चा कशी करणार, असा सवाल असल्याने पाकिस्तानने आज कोणताच हल्ला केलेला नसल्याचे समोर येत आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाच्या एक दिवसानंतर भारतीय लष्कराने माध्यमांना माहिती दिली होती. सीमेवर सर्व काही सामान्य आहे. पाकिस्तानकडून कोणताही हल्ला झालेला नाही. गोळीबाराची कोणत्याही घटनेची नोंद झाली नाही, त्यामुळे अलिकडच्या काही दिवसांत ही पहिलीच शांत रात्र ठरली, असे लष्कराने म्हटले आहे.
भारतीय लष्कराने सांगितले की ७ मे ते १० मे दरम्यान नियंत्रण रेषेवर ३५-४० पाकिस्तानी सैन्य सैनिक मारले गेले. नऊ दहशतवादी अड्ड्यांवर झालेल्या हल्ल्यात १०० दहशतवादी मारले गेले. यामध्ये पुलवामा हल्लेखोर आणि IC-814 चे अपहरणकर्ते यांचा समावेश होता.
दरम्यान आज दोन्ही देशांच्या डीजीएमओंची बैठक होणार आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेले समझोता पुढे कसा लागू ठेवायचा, स्थायी कसा बनवायचा यावर आजच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. पाकिस्तान पुन्हा या समझोत्याचे उल्लंघन करणार नाही आणि पुन्हा कोणतेही प्रक्षोभक पाऊल उचलणार नाही, अशी अपेक्षा संरक्षण तज्ज्ञ संजीव श्रीवास्तव यांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज दुपारी १२ वाजता डीजीएमओ स्तरावरील चर्चा होणार आहे.