पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 01:49 IST2025-05-13T01:47:58+5:302025-05-13T01:49:16+5:30
पाकिस्तानशी चर्चा होईल तर केवळ दहशतवादावरच आणि पीओकेवरच, भारत सहन करणार नाही आण्विक ब्लॅकमेलिंग! कारवाई केवळ स्थगित, पुन्हा आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर मिळेल; दहशतवाद्यांचा आत्मविश्वास भारताने नष्ट केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पाकिस्तानने अण्वस्त्र हल्ल्याच्या दिलेल्या धमक्यांना व त्याद्वारे ब्लॅकमेल करण्याच्या प्रयत्नांना भारत भीक घालत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. तसेच, त्या देशाविरोधातील ऑपरेशन सिंदूर कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याची घोषणाही त्यांनी केली. आता पाकिस्तान कसा वागतो, यावर भविष्यात पुढील कारवाईबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी तंबी पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला सोमवारी दिली. भारताने पाकिस्तानच्या छातीत वार केला. तीन थेट इशारे दिले. दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी शक्य नाही. दहशतवाद आणि व्यापार सोबत होऊ शकत नाही. पाणी आणि रक्त सोबत वाहणार नाही.
मोदी पुढे म्हणाले, दहशतवाद व पाकव्याप्त काश्मीर या दोन विषयांवरच भारत पाकिस्तानशी यापुढे चर्चा करील. ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी मी संरक्षण दलांना सलाम करतो. आपण सर्वांनी भारताचा संयम व क्षमता या दोन्ही गोष्टी पाहिल्या आहेत. पहलगाम हल्ल्यात २६ निरपराधांचा बळी गेला. त्यामुळे भारताने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानचे हल्ले भारताने परतवले. त्या पार्श्वभूमीवर जाहीर वक्तव्य करताना मोदी म्हणाले, या मोहिमेच्या यशस्वीतेमध्ये सर्व सुरक्षा यंत्रणांचे योगदान आहे. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर आणि प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ले केले. भारत असा निर्णय घेईल याची दहशतवाद्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. जेव्हा एखादा देश एकजुटीने उभा राहतो, देशाला प्रथम प्राधान्य या भावनेने प्रेरित होतो, तेव्हा पोलादी निर्णय घेतले जातात. त्यातून अतिशय उत्तम फलित मिळते. भारताने पाकिस्तानातील दहशतवादी केंद्रांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले केले, तेव्हा तेथील फक्त इमारतीच नव्हे तर त्यांच्या शस्त्रास्त्रांचा साठाही नष्ट झाला.मोदी म्हणाले की, भारतीय क्षेपणास्त्रे, ड्रोन जेव्हा पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करत होते, तेव्हा केवळ ते तळच नव्हे तर दहशतवाद्यांचा आत्मविश्वासही भारताने नष्ट केला. ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना मनात असल्यास अतिशय कठोर निर्णय घेता येतात.
पंतप्रधान म्हणाले, पाकिस्तानला भारताने अत्यंत अचूक व संपूर्ण सामर्थ्यानिशी प्रत्युत्तर दिले. या कारवाईत १००पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले. पाकिस्तानने पुढील हल्ले थांबविण्याचे आश्वासन दिल्यावरच आम्ही ऑपरेशन सिंदूरची कारवाई तात्पुरती स्थगित केली. बहावलपूर, मुरिदकेसारखी ठिकाणे जागतिक दहशतवादाची महत्त्वाची केंद्रे होती. भारताने त्यांच्या छातीवरच प्रहार केला, असेही त्यांनी सांगितले.
जवानांचे शौर्य आई-बहिणींना समर्पित
शत्रूंनी आपल्या माता-भगिनींच्या कपाळवरचे कुंकू (सिंदूर) पुसण्याचा प्रयत्न केला. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. आपल्या शूर जवानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जे पराक्रम गाजवले, ते अतुलनीय आहे. मी त्यांचे शौर्य प्रत्येक आई, बहिण आणि मुलीला समर्पित करतो. भारताविरोधात कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातले हे दहशतवादी खुलेआम कट रचत होते. ते पाकिस्तानमध्ये मोकळेपणाने फिरत होते. त्या दहशतवाद्यांना आम्ही एकाच कारवाईत संपविले आहे.
भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
सैन्य आणि पराक्रम
१. सशस्त्र दलांना संपूर्ण देशाकडून सॅल्यूट.
२. भारतीय सैनिकांचे शौर्य जगासमोर.
३. वीर जवानांचा पराक्रम मातांना, बहिणींना आणि मुलींना समर्पित.
४. ऑपरेशन सिंदूर ही देशाच्या भावना आणि न्यायाची शपथ.
५. भारताच्या तीनही सेनांचा अचूक समन्वय.
६. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि अर्धसैनिक बल पूर्ण सज्ज.
७. ‘मेड इन इंडिया’ शस्त्रसज्जतेची यशस्वी तपासणी.
८. न्यू एज वॉरफेअरमध्ये भारताची अग्रगण्य कामगिरी.
९. बळाच्या जोरावर शांतीची वाट.
हल्ल्याची पार्श्वभूमी
१०. २२ एप्रिलला पहलगाममध्ये निर्दोष नागरिकांवर अमानवी हल्ला.
११. धर्म विचारून, लहान मुलांपुढे हत्या
१२. दहशतवादाचा अति क्रूर चेहरा.
१३. संपूर्ण देशात संतापाची लाट.
१४. प्रत्येक घटक एकवटले.
१५. पंतप्रधानांसाठीही वैयक्तिकदृष्ट्या वेदनादायक घटना.
रणनीती आणि परिणाम
१६. भारताने सेनेला संपूर्ण मोकळीक.
१७. ६-७ मे दरम्यान पाकिस्तानात निर्णायक प्रहार.
१८. दहशतवादी तळ, ट्रेनिंग सेंटर्स लक्ष्य.
१९. बहावलपूर, मुरीदके यांसारखे प्रमुख अड्डे नष्ट.
२०. या अड्ड्यांचे संबंध ग्लोबल टेरर हल्ल्यांशी.
२१. १०० पेक्षा अधिक दहशतवादी ठार.
२२. अनेक दशकांपासून भारतविरोधी षड्यंत्र करणारे मारले गेले.
२३. पाक सरकारकडून दहशतवादाला संरक्षणाचे पुरावे मिळाले.
पाकिस्तानचे अपयश
२४. पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला.
२५. मंदिरे, गुरुद्वारे, शाळा, नागरिकांची घरे टार्गेट.
२६. पाक ड्रोन्स आणि मिसाईल हवेतच उद्ध्वस्त केल्या.
२७. सीमेला उत्तर न देता पाकिस्तानच्या ‘सीने’वर प्रहार.
२८. पाकच्या हवाई तळांना गंभीर नुकसान.
२९. पाकिस्तानला तीन दिवसांत जबर धक्का.
शस्त्रसंधी आधी
३०. पाकिस्तानला मोठा फटका बसल्यानंतर संवादाची मागणी.
३१. १० मे रोजी पाक सैन्याने डीजीएमओला संपर्क साधला.
३२. भारताची कारवाई फक्त स्थगित, पूर्णपणे थांबलेली नाही.
३३. पाकचा पुढील प्रत्येक निर्णय भारत परीक्षण करेल.
भारताची स्पष्ट नीती
३४. भारतावर हल्ला झाला, तर प्रचंड प्रत्युत्तर.
३५. भारत स्वतःच्या अटींवर प्रतिक्रिया देईल.
३६. न्यूक्लिअर ब्लॅकमेल खपवून घेतला जाणार नाही.
३७. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांवरही कारवाई.
३८. दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणारे वेगळे मानले जाणार नाहीत.
३९. स्टेट स्पॉन्सर्ड टेररचा पुन्हा पुरावा – पाक लष्कराची भूमिका.
४०. भारत सुरक्षा आणि नागरिकांचे रक्षण यासाठी निर्णायक पावले उचलेल.
४१. ऑपरेशन सिंदूर – सर्जिकल/एअर स्ट्राइकपाठोपाठ नवे धोरण.
जगाला संदेश
४२. टेरर आणि टॉक एकत्र शक्य नाहीत.
४३. टेरर आणि ट्रेड एकत्र शक्य नाहीत.
४४. पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही.
४५. जगाने टेरर विरोधात झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारावे.
४६. पाकिस्तानने टेरर इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट केल्याशिवाय शांती शक्य नाही.
४७. पाकिस्तानचा स्वतःचाच नाश होईल, जर तो सुधारला नाही.
४८. भारताचे धोरण स्पष्ट
४९. पाकिस्तानशी संवाद फक्त टेरर आणि पीओकेवरच.
शांततेचा संदेश
५०. भगवान बुद्धांनी शांतीचा मार्ग दाखवला.
५१. शांततेचा मार्ग ताकदीतूनच जातो
५२. विकसित भारत घडवायचा तर भारत शक्तिशाली असणे आवश्यक
५३. विकसित भारत घडवायचा तर भारत शक्तिशाली असणे आवश्यक
५४. गरज भासल्यास या शक्तीचा वापर
५५. एकतेचा, सामर्थ्याचा आणि संकल्पाचा जयघोष.
५६. भारत माता की जय!