९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 01:54 IST2025-05-12T01:45:29+5:302025-05-12T01:54:22+5:30
हे घ्या पुरावे; मोस्ट वाँटेडसह १०० पेक्षा जास्त अतिरेकी यमसदनी, भारताचेही ५ जवान शहीद

९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने ७ मे रोजी पाकिस्तान हद्दीत घुसून ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर दोन्ही देशांत निर्माण झालेला तणाव आणि यातून झालेले परस्परांवरील हल्ले-प्रतिहल्ल्यांची माहिती भारताच्या लष्करी मोहिमांचे महासंचालक लेफ्ट. जनरल राजीव घई यांच्यासह हवाई व नौदलाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
यानुसार, भारताने या कारवाईत मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांसह १००हून अधिक दहशतवादी यमसदनी पाठवले. ७ ते १० मेदरम्यान शत्रूच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे ३५ ते ४० सैनिक मारले गेल्याची माहिती या वेळी देण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत हवाई दलाचे सर्व पायलट सुखरूप परतल्याचे एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले. तर, वेळप्रसंगी कराची बंदरावर जोरदार हल्ल्यासाठी नौदल सज्ज होते, असे व्हाईस ॲडमिरल ए. एन. प्रमोद यांनी सांगितले.
९ दहशतवादी अड्ड्यांना टार्गेट करत अचूक शस्त्रे वापरून उद्ध्वस्त केले
लष्करी मोहिमांचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, या संघर्षात ३५-४० पाकिस्तानी लष्करी जवान ठार करण्यात आले. या कारवाईत भारताचे उद्दिष्ट साध्य झाले आहे आणि यापुढे पाकिस्तानने कोणतेही दु:साहस केले तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल.
घई यांनी सांगितले की, या कारवाईत शहीद झालेल्या पाच भारतीय जवानांना आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहत आहोत. आतापर्यंत आम्ही प्रचंड संयम बाळगला आहे. आम्ही आमच्या कृती केंद्रित आणि संतुलित केल्या आहेत. तथापि, आमच्या नागरिकांच्या सार्वभौमत्वाला, प्रादेशिक अखंडतेला आणि सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण झाल्यास निर्णायक ताकदीने सामना केला जाईल.
ते म्हणाले की, सात मे रोजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान आयसी ८१४च्या अपहरणात व पुलवामा बॉम्बस्फोटात सामील असलेल्या युसूफ अजहर, अब्दुल मलिक रऊफ व मुदासिर अहमद यांसारख्या अतिरेक्यांसह १०० पेक्षा अधिक दहशतवादी यमसदनी पाठवण्यात आले. काळजीपूर्वक विचारविनिमय केल्यानंतर नऊ दहशतवादी अड्डे निश्चित करण्यात आले. त्यांना अचूक शस्त्रे वापरून उद्ध्वस्त करण्यात आले.
कराची बंदरावरील हल्ल्यासाठी नौदलाने पूर्ण तयारी केली होती
पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी भारतीय नौदल पूर्णपणे सज्ज होते. पाकिस्तानच्या कराची क्षेत्राला नौदलाने पूर्णपणे घेरले होते. भारतीय सैन्याने पूर्ण तयारीसह समुद्र आणि जमिनीवरील निवडक लक्ष्यांवर कधीही हल्ला करण्याची तयारी केल्याचे व्हाइस ॲडमिरल ए. एन. प्रमोद यांनी रविवारी स्पष्ट केले.
भारतीय नौदलाने केवळ तत्परताच दाखवली नाही तर भारतीय सागरी सीमांची सुरक्षा निश्चित करत आपल्या दलांना युद्धासाठी पूर्णपणे सज्ज ठेवल्याचे प्रमोद म्हणाले. ऑपरेशन सिंदूर या अंतर्गत अरबी समुद्रात धोरणात्मक स्थिती मजबूत करण्यात आली.
सागरी व जमिनीवरील हल्ल्यासाठी नौदल पूर्ण तयारीने समुद्रात तैनात केले होते. त्यामुळे कराची बंदरासह कोणत्याही महत्त्वाच्या लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी भारतीय नौदल पूर्णपणे सज्ज होते. भारताकडे शत्रूच्या लक्ष्यांविरुद्ध अचूक आणि उच्च प्रभावशाली अभियान राबवण्याची पूर्ण क्षमता असल्याचे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट होत असल्याचे प्रमोद म्हणाले.
शत्रू टप्प्याबाहेर नाही हे दाखवून दिले, आमचे सर्व पायलट सुखरूप; एअर मार्शल ए. के. भारती
भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले, ‘७ मे रोजी रात्री लाहोर आणि गुजरानवालातील रडार यंत्रणेला लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी लष्करी ठाणी भारतीय लष्कराच्या टप्प्याबाहेर नाहीत हे आम्हाला दाखवून द्यावयाचे होते. ८ व ९ मे रोजी पाकिस्ताननेही ड्रोन आणि विमानांनी भारतीय सीमेवर हल्ला केला होता; परंतु भारतीय लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचे त्यांचे बहुतांश प्रयत्न फोल ठरले.’ या सर्व कारवाईत आमचे सर्व पायलट सुखरूप परतले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली़.
शत्रूने लक्ष्य निश्चित करून रात्री उशिरापर्यंत हल्ले केले; परंतु भारतीय लष्कराच्या किंवा नागरी पायाभूत व्यवस्थेला कोणताही अपाय झाला नाही. दुसरीकडे लाहोरजवळून त्यांनी ड्रोन हल्ले सुरू केले होते आणि लाहोर हवाई क्षेत्रातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणेही सुरू ठेवली. याच्या आड भारतीय हद्दीत हल्ले करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचे भारती म्हणाले.
१० मे रोजी डीजीएमओचा फोन : १० मे ला दुपारी साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानी डीजीएमओचा फोन आला. सायंकाळी ७ नंतर परस्परांवर हल्ले केले जाणार नाहीत, असे ठरले; परंतु काही तासांतच पाकिस्तानने संघर्ष थांबवण्यासाठीचा हा करार मोडला.
शत्रूची दुखरी नस आम्ही पकडली : जम्मू, उधमपूर, पठाणकोट, डलहौजी, फलौदी या भागात पाकिस्तानने हल्ले केले. आम्ही त्यांची एअर डिफेन्स सिस्टम नष्ट केली. त्यांनी भारतीय हवाई तळांवर आणि लष्करी ठाण्यांवर हल्ले सुरू केल्यावर आम्ही चोख प्रत्युत्तर देत हल्ले केले. त्यांची दुखरी नस असलेल्या एअरबेस कमांड सिस्टम आणि लष्करी हवाई तळांना लक्ष्य केले. भारतीय हवाई दलाने रफिकी, रहरयार खान आणि चकलालामध्ये तुफान हल्ले केले.