Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 15:43 IST2025-05-12T15:41:08+5:302025-05-12T15:43:45+5:30
Operation sindoor updates: ऑपरेशन सिंदूरबद्दल भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेऊन या मोहिमेबद्दल महत्त्वाचे अपडेट्स दिले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये बदल झाल्याचे यावेळी डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले.

Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
२२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी पहलगाममधील बैसरन पठारावर पर्यटकांवर हल्ला केला. २६ पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली. दहशतवाद्यांकडून गेल्या काही वर्षात नागरिकांनाही लक्ष्य केलं जात असल्याचा मुद्दा आज भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी अधोरेखित केला. २०१४ पासून सुरू झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यांच्या पापाचा घडा पहलगाममध्ये भरला, असे ते म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लष्कराच्या तिन्ही दलाच्या अधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेबद्दलची अधिक माहिती दिली. यावेळी लष्कराच्या अधिकाऱ्याने पाकिस्तानचे हल्ले कसे हाणून पाडले, याचेही पुरावेही दाखवले.
पहलगाममध्ये त्यांच्या पापाचा घडा भरला -राजीव घई
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, "दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये बदल होत चालले आहेत. लष्करासोबतच आता निष्पाप नागरिकांवर, जे स्वतःचे संरक्षण करण्यात अपयशी ठरतात. त्यांच्यावरही हल्ले केले जात आहेत."
वाचा >>'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
"२०२४ मध्ये जम्मूमधील शिवखोरी मंदिराकडे जाताना भाविकांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता यावर्षी एप्रिलमध्ये पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. हा दहशतवादी हल्ल्यांचा ट्रेंड बदलला असल्याची उदाहरणे आहेत. शिवखोरीनंतर पहलगामममध्ये त्यांच्या पापाचा घडा भरला होता. त्यानंतर जे घडलं आहे, त्याबद्दल आम्ही सविस्तर बोललो आहे", असे राजीव घई म्हणाले.
'आम्हाला माहिती होतं की, पाकिस्तान हल्ले करणार'
"भारताने हवाई हल्ले केले. आम्हाला पूर्ण जाणिव होती की, पाकिस्तानचा हल्लाही अशाच प्रकारे असेल, त्यामुळे आम्ही आपली एअर डिफेन्स यंत्रणा पूर्णपणे सज्ज केलेली होती", अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
"आम्ही सज्ज होतो. हवाई संरक्षण प्रणालीही तयार होती. आपली हवाई संरक्षण प्रणाली भिंतीसारखी तयार होती. पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडण्याची आम्ही आधीच तयारी केली होती. जब हौंसले बुलंद हो, तो मंजिले भी कदम चुमती है", असे उद्गार राजीव घई यांनी यावेळी काढले.