'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 19:56 IST2025-05-11T19:55:11+5:302025-05-11T19:56:19+5:30

Operation Sindoor: पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ: DGMO राजीव घई

Operation Sindoor: 'Indian Army killed 40 Pakistani soldiers on LoC', DGMO's big information about Operation Sindoor | 'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती

'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती

Operation Sindoor: भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'चे उद्दिष्ट फक्त पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करणे, हे होते आणि त्यात भारताला मोठे यश मिळाले आहे. आज(11 मे) तिन्ही सैन्याच्या महासंचालकांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती दिली. लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक(डीजीएमओ) राजीव घई म्हणाले की, दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला आणि 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. यामध्ये कंधार अपहरण आणि पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेला युसूफ अझहर, अब्दुल मलिक आणि मुदस्सीर अहमद सारखे दहशतवादीदेखील ठार झाले.

40 पाकिस्तानी सैनिक ठार
डीजीएमओ घई पुढे म्हणाले की, पाकिस्तानने लहान ड्रोन आणि यूएव्हीद्वारे भारताच्या लष्करी तळांना आणि हवाई पट्ट्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेने प्रत्येक हल्ला हाणून पाडला. सीमेपलीकडून होणाऱ्या पाकिस्तानी गोळीबाराला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईतील भारतीय सैन्याने केवळ नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याचे 30-40 सैनिक आणि अधिकारी मारले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे पाच जवानही शहीद झाले. भारताकडून होणाऱ्या प्रत्युत्तर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी पाकिस्तानने नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून केला, परंतु आम्ही कोणत्याही नागरी विमानाला लक्ष्य केले नाही, फक्त पाकिस्तानमधील लष्करी तळांना लक्ष्य केल्याची माहिती त्यांनी दिली.

...तर पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देऊ
राजीव घई पुढे म्हणाले की, काल दुपारी 3.35 वाजता माझा पाकिस्तानच्या डीजीएमओशी संपर्क झाला. पाकिस्तानच्या डीजीएमओने सुचविल्यानुसार 10 मे 2025 रोजी संध्याकाळी 5:00 वाजल्यापासून दोन्ही देशांमधील युद्धविराम घोषित झाला. आम्ही 12 मे 2025 रोजी पुन्हा चर्चा करण्याचे ठरवले होते, मात्र पाकिस्तानने लगेच या करारांचे उल्लंघन केले आणि भारतीय सीमेत गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरू केले. भारतीय सैन्याने यालाही कडक प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. यानंतर आम्ही पाकिस्तानच्या डीजीएमओला एक हॉटलाइन संदेश पाठवला, इशारा दिला की, जर पाकिस्तानने पुन्हा युद्धविरामचे उल्लंघन केले, तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल.

Web Title: Operation Sindoor: 'Indian Army killed 40 Pakistani soldiers on LoC', DGMO's big information about Operation Sindoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.