लादेनची मदत, कसाबला प्रशिक्षण अन्... भारताने हवाई हल्ल्यात उडवून दिले हाफिज सईदचे महत्त्वाचे ठिकाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 10:05 IST2025-05-07T10:00:52+5:302025-05-07T10:05:46+5:30
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर-ए-तोयबा संस्थापक दहशतवादी हाफिज सईद याचे महत्त्वाचे ठिकाण लक्ष्य केले आहे.

लादेनची मदत, कसाबला प्रशिक्षण अन्... भारताने हवाई हल्ल्यात उडवून दिले हाफिज सईदचे महत्त्वाचे ठिकाण
Operation Sindoor on Muridke Markaz: भारताने पहलगाममध्ये शहीद झालेल्या २६ पर्यटकांचा बदला घेतला आहे. भारताने पाकिस्तान आणि पीओकेवर अनेक क्षेपणास्त्रे डागून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ९ ठिकाणी झालेल्या २४ हल्ल्यांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. भारताने अनेक देशांना या हल्ल्याची माहिती दिली आहे. हल्ला करण्यात आलेल्या ९ ठिकाणांपैकी ४ ठिकाणे ही पाकिस्तानात आणि ५ ठिकाणे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत. भारतीय सैन्याने दहशतवादी हाफिज सईदचा अड्डे उद्ध्वस्त केला आहे.
मंगळवार मध्यरात्री भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या हवाई हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी पंजाबमधील मुरिदके आणि बहावलपूर शहरांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. लाहोरपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेले मुरिदके शहर हे लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा संस्थापक दहशतवादी हाफिज सईद याच्यासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. भारताकडून मुरिदके येथील मुरिदके मरकज ट्रेनिंग कॅंम्पवरदेखील हल्ला करण्यात आला.
या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालये मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत. भारताच्या या कृतीमुळे हाफिज सईद आणि मसूद अझहर या दोन्ही दहशतवादी संघटनांच्या नेत्यांची ताकद संपल्याचे म्हटलं जात आहे. एलईटीचे मुख्यालय असलेल्या मुरिदके मरकजयाच्या बांधकामासाठी ओसामा बिन लादेनने १ कोटी रुपये दिले होते. लाहोरच्या ग्रँड ट्रंक रोडवर मुरिदके मरकज आहे. त्याला 'मरकज-ए-तोयबा'ही म्हणतात. यामध्ये मशीद आणि अतिथीगृह बांधण्यासाठी लादेनने १ कोटी रुपयांची मदत केली होती.
२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सर्व गुन्हेगारांना पाकिस्तानच्या आयएसआयने इथेच प्रशिक्षण दिले होते. यामध्ये अजमल कसाबचाही समावेश होता. जैशच्या बहावलपूर मुख्यालयाप्रमाणे हे कॉम्प्लेक्स लष्कर-ए-तोयबाचे वैचारिक, लॉजिस्टिक आणि ऑपरेशनल सेंटर आहे. इथे शेकडो तरुण पाकिस्तान आणि काश्मीरमधून आणले जातात आणि त्यांना दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षण दिले जाते. २०० एकरमध्ये पसरलेले कॉम्प्लेक्स जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी अड्ड्यांपैकी एक मानले जात होते. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात हाफिज सईदने आयएसआय आणि बाहेरुन आलेल्या निधीच्या मदतीने त्याची स्थापना केली होती.