भारताने बुधवारी पहाटे ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तान भारतावर प्रतिहल्ला करेल असे वाटले होते. तसेच भारत पुन्हा पाकिस्तानवर आज रात्री हल्ला करेल असेही वाटले होते. यावरून सोशल मीडियावर मात्र अफवांचा बाजार उठला होता. साडे अकरा, बारा वाजण्याच्या सुमारास भारताने सियालकोटवर हल्ला चढविल्याचे व्हिडीओ व्हायरल केले जाऊ लागले होते. याला प्रत्यूत्तर म्हणून पाकिस्तानींकडून काही वेळाने म्हणजेच दोन वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने अमृतसरसह पंजाबच्या भागात हल्ले चढविल्याचे व्हिडीओ व्हायरल केले जाऊ लागले.
दोन्ही बाजुंनी एकमेकांवरील हल्ल्याचे दावे केले जाणारे व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल केले जाऊ लागले होते. भारत पाकिस्तान युद्ध प्रत्यक्षात नाही तर सोशल मीडियावर चांगलेच रंगले आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्याचे व्हिडीओ, फोटो आता सकाळपर्यंत देखील व्हायरल केले जात आहेत.
अमृतसरमध्ये रात्री दोनच्या सुमारास दुसऱ्यांदा ब्लॅक आऊट करण्यात आला होता. हीच वेळ पाकिस्तानी आणि भारतीय ट्रोलर्सनी साधली आणि पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्याचे व्हिडीओ व्हायरल करू लागले. भारतीयांनी पंजाबी नागरिक घराबाहेर आल्याचे आणि तीन ते चार स्फोटांचे आवाज ऐकल्याचे तसेच अमृतसर विमानतळावरून एसएएम म्हणजेच क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा फायर करण्यात आल्याचे दावे केले जात होते. काहींनी तर पाकिस्तानी विमानांना, ड्रोनना या एअर डिफेन्स सिस्टिमने पाडल्याचे देखील दावे केले होते.
तर पाकिस्तानी अकाऊंटवरून अमृतसर आणि आजुबाजुच्या शहरांत पाकिस्तानने जोरदार मिसाईल हल्ले केल्याचे दावे केले जात होते. यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. जो तो अमृतसरवासियांसाठी प्रार्थना करत होता. परंतू, अमृतसर प्रशासनाने सर्व काही सुरक्षित असल्याचे जाहीर केले.
नेमके काय झालेले...
अमृतसरमध्येही रात्री १०.३० ते ११ वाजेपर्यंत अर्धा तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. परंतू, पुन्हा लाईट सुरु करण्यात आल्या. यानंतर काही वेळाने मोठे आवाज ऐकू आल्याने प्रशासनाने पुन्हा ब्लॅकआऊट केले. यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली. अमृतसरचे पोलिस आयुक्त गुरप्रीत भुल्लर यांनी स्पष्ट केले की, "मलाही स्फोटांचा आवाज ऐकू आला, पण आम्ही घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता काहीही आढळले नाही. खबरदारी म्हणून आम्ही ब्लॅकआउट लागू केले."