ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 06:30 IST2025-05-11T06:28:24+5:302025-05-11T06:30:06+5:30
पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहमदच्या दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात या संघटनांचे पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार झाले.

ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर 'अंतर्गत, ७ मे रोजी पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहमदच्या दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात या संघटनांचे पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार झाले. १९९९ मध्ये आयसी-८१४ विमानाच्या अपहरणाचा मास्टरमाइंड युसूफ अझहरदेखील ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये समावेश होता.
केंद्रीय गृह मंत्रालयाने तयार केलेल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत २१व्या क्रमांकावर असलेला मोहम्मद युसूफ अझहर हा जैश-ए-मोहम्मद प्रमुख मौलाना मसूद अझहरचा नातेवाईक होता. युसूफ अझहर हा इंडियन एअरलाइन्सच्या विमान आयसी-८१४ च्या अपहरणाचा सूत्रधार होता.
मसूद अझहरचा आणखी एक नातेवाईक हाफीज मोहम्मद जमीलदेखील या हल्ल्यात मारला गेला. तो बहावलपूरमधील मरकझ सुभान अल्लाहचा प्रभारी होता. जमील तरुणांना कट्टरतावादी बनवण्यात आणि जैश-ए-मोहम्मदसाठी निधी उभारण्यात सक्रियपणे सहभागी होता.
लष्कर-ए-तय्यबा दहशतवादी मुदस्सर खादियान ऊर्फ मुदस्सर ऊर्फ अबू जुंदाल मुरीदके येथील मरकझ तय्यबाचा प्रभारी होता. दहशतवादी संघटनेच्या मुख्य तळावर भारतीय सैन्याने केलेल्या छाप्यात तो मारला गेला. खादियानच्या अंत्यसंस्काराने पाक सरकार आणि दहशतवादामधील सक्रिय संगनमत उघडकीस आणले. कारण पाकिस्तानी सैन्याने त्याला 'गार्ड ऑफ ऑनर' दिला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला.
दहशतवादी खालिद ऊर्फ अबू आकाशा हा जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता. पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि फैसलाबादचे उपायुक्त फैसलाबादमध्ये त्याच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते. या हल्ल्यात पीओकेमधील जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी यांचा मुलगा मोहम्मद हसन खानदेखील मारला गेला.