आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 22:11 IST2025-05-14T22:10:01+5:302025-05-14T22:11:14+5:30
Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, आता या मोहिमेची थरारक माहिती टप्प्याटप्प्याने समोर येत आहे.

आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, आता या मोहिमेची थरारक माहिती टप्प्याटप्प्याने समोर येत आहे. हा हल्ला करताना पाकिस्तानच्या हवाई संरक्षणाची मदार असलेल्या चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला भारतीय सैन्यदलांनी जॅम करून टाकले होते. त्यानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून भयंकर तांडव करत दहशतवाद्यांचे अड्डे अवघ्या २३ मिनिटात उद्ध्वस्त केले होते.
भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूरअंतर्गत सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या प्रतिहल्ल्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या चार हवाई तळांवर निशाणा साधला होता. त्यामध्ये चकलाला, रफीक आणि रहीम यार खान या तळांचा समावेश होता. त्यानंतर भारताने सरगोधा, भुलरी आणि जेकोबाबाद या तळांवरही हल्ले केले होते. पाकिस्तानने चीनकडून मिळवलेली एअर डिफेन्स सिस्टिम भारतीय ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी बघता बघता भेदली. तसेच अवघ्या २३ मिनिटांच्या मोहिमेत ऑपरेशन सिंदूर फत्ते केले.
याबाबत अधिकृतरीत्या समोर आलेल्या माहितीनुसार भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानने चीनकडून घेतलेल्या एअर डिफेन्स प्रणालीची सुरक्षा व्यवस्था भेदून तिला जॅम करून टाकले होते. त्यानंतर पुढील मोहीम केवळ २३ मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. भारताने पाकिस्तानमधील हे सर्व हल्ले आपली कुठलीही हानी न होता पूर्णत्वास नेले होते.