ऑपरेशन सिंदूर इफेक्ट...! आता खुद्द इस्रायल भारताकडून खरेदी करणार शस्त्रास्त्रे, झाला मोठा करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 16:38 IST2025-05-26T16:37:16+5:302025-05-26T16:38:04+5:30
ऑपरेशन सिंदूरमध्ये, भारतीय सैन्याने मोठे शौर्य दाखवले आणि काही तासांतच पाकिस्तानी हवाई दलाचे कंबरडे मोडले. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये ७० टक्क्यांहून अधिक स्वदेशी शस्त्रे वापरली आणि काही तासांतच पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पडले.

ऑपरेशन सिंदूर इफेक्ट...! आता खुद्द इस्रायल भारताकडून खरेदी करणार शस्त्रास्त्रे, झाला मोठा करार
जगात दहशतवादाची सर्वाधिक झळ सोसलेला आणि सोसत असलेला इस्रारायल आता भारताकडून शस्त्रास्त्रे खरेदी करणार आहे. इस्रायल हा एक असा देश आहे, ज्याला इस्लामिक जग आपला सर्वात मोठा शत्रू मानते. हा तोच इस्रायल आहे जो गेल्या महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताच्या बाजूने उभा राहिला होता. या हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हाही इस्रायल भारताच्या समर्थनात ठामपणे उभा राहिला. एवढेच नव्हे तर, पाकिस्तानात घुसून दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करणे हा भारताचा अधिकार आहे आणि भारताने तसे करायला हवे. भारत हा दहशतवादाची मोठी झळ बसलेला देश आहे, असे इस्रायलने म्हटले होते.
ऑपरेशन सिंदूरमध्ये, भारतीय सैन्याने मोठे शौर्य दाखवले आणि काही तासांतच पाकिस्तानी हवाई दलाचे कंबरडे मोडले. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये ७० टक्क्यांहून अधिक स्वदेशी शस्त्रे वापरली आणि काही तासांतच पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पडले. पाकिस्तानची सर्व चिनी शस्त्रे निष्प्रभ झाली. या कारवाईनंतर भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र, आकाश संरक्षण प्रणाली आणि इतर शस्त्रांना जागतिक मान्यता मिळाली आहे.
भारतातील शस्त्रास्त्रांची मागणी वाढली
यानंतर, जगाच्या दृष्टीने भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यातच आता इस्रायलही भारताकडून शस्त्रे खरेदी करत आहे. महत्वाचे म्हणजे, इस्रायलची शस्त्रे आणि संरक्षण व्यवस्था जगभरात प्रसिद्ध आहेत. याच इस्रायलने भारताच्या निबे लिमिटेड कंपनीसोबत १७.५ कोटी डॉलर्स म्हणजेच १५० कोटी रुपयांचा रॉकेट लाँचर करार केला आहे. NIBE ही देशातील एक आघाडीची कंपनी आहे जी महत्त्वाच्या संरक्षण प्रणालींचे उत्पादन करते. त्यांनी इस्रायलकडून मिळालेल्या या खरेदी ऑर्डरची घोषणा केली आहे. खरे तर ही एक छोटी ऑर्डर आहे. मात्र हिचे महत्व फार मोठे आहे. जर इस्रायलसारखा देश भारताच्या शस्त्रांवर विश्वास दाखवत असेल, तर जगभरात भारताच्या शस्त्रांवरील विश्वास वाढेल आणि येणाऱ्या काळात त्याचा व्यापक परिणाम दिसून येईल.