Operation Sindoor ( Marathi News ): भारतीय लष्कराने काल पाकिस्तान आणि पीओके मधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. दरम्यान, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दोन्ही देशातील सीमेवर तणाव वाढला आहे. यामुळे भारतीय लष्करही अलर्ट आहेत.
'ऑपरेशन सिंदूर' नंतर, घाबरलेला पाकिस्तान नियंत्रण रेषेवर सतत गोळीबार करत आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे आणि देशातील सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत. तसेच राजस्थानमधील जोधपूरसारख्या सीमावर्ती भागात, पुढील आदेश येईपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय
मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सीमेवर सतत गोळीबार होत आहे. हे लक्षात घेऊन, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सीमावर्ती भागात सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत.
तसेच खबरदारीचा उपाय म्हणून, राजस्थानच्या जोधपूर प्रशासनाने गुरुवारपासून पुढील आदेशापर्यंत सर्व खाजगी, सरकारी शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर केली आहे. सर्व शैक्षणिक आणि बिगर-शैक्षणिक कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये उपस्थित राहून विभागीय काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
१२ व्या दिवशीही गोळीबार
पाकिस्तानने सलग १४ व्या दिवशी नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे, जोरदार तोफांचा मारा केला आहे. भारतीय लष्कराने याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
"७-८ मे २०२५ च्या रात्री, पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रे आणि तोफखान्यांचा वापर करून विनाकारण गोळीबार सुरू केला, या गोळीबाराला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
अनेक विमानतळ बंद
या तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील किमान २५ विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. यामध्ये श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाला आणि जामनगर या प्रमुख विमानतळांचा समावेश आहे. याशिवाय, भारत सरकारने युद्ध परिस्थितीला तोंड देण्यासाठी ७ मे रोजी देशभरात अनेक ठिकाणी मॉक ड्रिलचे आयोजन केले होते.