‘ऑपरेशन ब्लू स्टार चूकच, इंदिराजी जीवाला मुकल्या’; ही चूक केवळ इंदिरा गांधींची नव्हे तर; पी. चिदम्बरम यांच्या विधानावरून राजकारण पेटलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 11:45 IST2025-10-13T11:44:51+5:302025-10-13T11:45:28+5:30
शनिवारी कसौली येथे ‘दे वील शूट यू मॅडम : माय लाइफ थ्रू कन्फ्लिक्ट’ या पत्रकार हरिंदर बावेजा लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

‘ऑपरेशन ब्लू स्टार चूकच, इंदिराजी जीवाला मुकल्या’; ही चूक केवळ इंदिरा गांधींची नव्हे तर; पी. चिदम्बरम यांच्या विधानावरून राजकारण पेटलं
सिमला : पंजाबमध्ये सुवर्ण मंदिरात दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी भारतीय लष्कराने हाती घेतलेल्या १९८४ सालच्या ऑपरेशन ब्लू स्टार कारवाईचा निर्णय योग्य नव्हता, त्यापेक्षा अन्य मार्गाने दहशतवादी ताब्यात घेता आले असते; पण या कारवाईमुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जिवाचे मोल चुकवावे लागले, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी केले. शनिवारी कसौली येथे ‘दे वील शूट यू मॅडम : माय लाइफ थ्रू कन्फ्लिक्ट’ या पत्रकार हरिंदर बावेजा लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
चिदम्बरम यांनी ऑपरेशन ब्लू स्टार कारवाई ही चूक असल्याचे स्पष्ट करताना या कारवाईला केवळ इंदिरा गांधी यांना जबाबदार धरता येणार नाही, तर ती भारतीय लष्कर, गुप्तचर संस्था, पोलिस, नागरी संरक्षण दले, अशा सर्वांची सामूहिक चूक होती; पण मला असे विधान करताना कोणाचाही, लष्करी अधिकाऱ्यांचा अवमान करण्याचा हेतू नाही. सुवर्ण मंदिर ताब्यात घेण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टारचा मार्ग योग्य नव्हता, असे म्हटले. उलट तीन-चार वर्षांनी लष्कराला वगळून सरकारने ऑपरेशन ब्लॅक थंडर हाती घेऊन पंजाबमधील परिस्थिती नियंत्रणात आणली होती, याकडेही पाहिले पाहिजे, असे चिदम्बरम म्हणाले. भिंद्रनवाले याच्या उदयाला इंदिरा गांधी जबाबदार होत्या, हा पुस्तकातला आरोपही त्यांनी फेटाळला.
'... मग ते इंदिरा गांधींचे राजकीय साहस होते, अशी इतिहासात नोंद'
ऑपरेशन ब्लू स्टार मुद्द्यावर चिदंबरम यांच्यावर भाजपने टीका केली असून ‘ऑपरेशन ब्लू स्टार हे राष्ट्राच्या हितासाठी नव्हते, तर ते इंदिरा गांधी यांचे राजकीय साहस होते, अशी इतिहासात नोंद केली जावी,’ असे म्हटले.
चिदंबरम यांनी सत्य सांगितले व आजपर्यंत पसरवलेल्या खोट्या धारणा उघड केल्यामुळे काँग्रेस चिदंबरम यांच्यावर कारवाई करील का, असा सवालही भाजपने केला आहे.
काँग्रेस नेतृत्व झाले ‘खूप नाराज’
ऑपरेशन ब्लू स्टार’वरच्या चिदम्बरम यांनी केलेल्या टिपणीमुळे काँग्रेस नेतृत्व ‘खूप नाराज’ आहे आणि पक्षाची कोंडी होईल, अशी विधाने करण्यापूर्वी ज्येष्ठ नेत्यांनी काळजी घ्यावी, असे मत पक्षाच्या सूत्रांनी व्यक्त केले. ज्या ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेसकडून सर्व काही मिळाले आहे, त्यांनी पक्षासाठी अडचणी निर्माण करणारी विधाने सार्वजनिकरीत्या करताना अधिक काळजी घ्यायला हवी आणि हे वारंवार करण्याची सवय बनू नये, असे काँग्रेसने म्हटले आहे.
काय होते ऑपरेशन ब्लू स्टार -
८० च्या दशकात स्वतंत्र खलिस्तान राष्ट्र मागणीसाठी पंजाबमध्ये दहशतवादी संघटनांनी हिंसाचार सुरू केला होता.
यादरम्यान दमदमी टाकसालचे एक नेते जर्नेल सिंग भिंद्रनवाले व त्याचे काही शस्त्रसज्ज साथीदार शिखांचे पवित्र समजल्या जाणाऱ्या सुवर्ण मंदिरात दबा धरून बसले होते.
दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने १ जून ते १० जून १९८४ दरम्यान लष्करी कारवाई केली होती. या कारवाईत भिंद्रनवाले याच्यासह सर्व दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला होता.