वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:28 IST2025-11-04T13:28:22+5:302025-11-04T13:28:49+5:30
शाळेच्या हजेरीपटावर ५० विद्यार्थ्यांची नोंद झाल्याचे दिसत होते. यानंतर त्यांनी वर्गातील मुलांना काही प्रश्न विचारले, पण या मुलांना त्यांची उत्तरेच देता आली नाहीत.

वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
शाळा म्हणजे विद्येचं मंदिर असं आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं. याचं ठिकाणी आपल्याला आयुष्यभराचं ज्ञान मिळतं. मात्र, आता असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जो ऐकून तुम्ही देखील स्तब्ध व्हाल. राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा नुकत्याच एका शाळेत निरीक्षणासाठी पोहोचल्या असता, जे सत्य समोर आलं त्याने त्यांनाही धक्का बसला. या शाळेच्या वर्गात अवघे १२ विद्यार्थी शिकत होते, मात्र शाळेच्या हजेरीपटावर ५० विद्यार्थ्यांची नोंद झाल्याचे दिसत होते. यानंतर त्यांनी वर्गातील मुलांना काही प्रश्न विचारले, पण या मुलांना त्यांची उत्तरेच देता आली नाहीत.
सदर प्रकार उत्तर प्रदेशच्या फॉक्सगंजमधून समोर आला आहे. या भागातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेला राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष चारु चौधरी यांनी भेट दिली. या शाळेत एकाच खोलीत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू होते. चारपैकी तीन शिक्षिका रजेवर होत्या आणि एकच शिक्षिका मुलांना शिकवत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, वर्गात फक्त १२ विद्यार्थी उपस्थित होते, तर रजिस्टरमध्ये तब्बल ५० विद्यार्थ्यांची नोंद होती. 'देशाचे पंतप्रधान कोण?' असा प्रश्न विचारलं असता, मुलांना उत्तर देखील देता आले नाही.
उत्तर प्रदेश सरकार अंगणवाडी केंद्रांद्वारे प्राथमिक शाळा आणि पूर्व-प्राथमिक शाळा चालवते. मात्र, प्रत्यक्षात समोर काही वेगळेच सत्य आले आहे. राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा चारू चौधरी यांनी गाजीपूरला भेट दिली आणि कोतवाली परिसरातील फॉक्सगंज प्राथमिक शाळेला भेट दिली, तेव्हा शाळेतील गैरकृत्ये उघडकीस आली. आधीच शाळेत ३ शिक्षिका एकाचवेळी सुट्टीवर असल्याचे आणि रजिस्टरमध्ये खोटी नोंद असल्याचे पाहून चारू चौधरी यांनी उपस्थित असलेल्या शिक्षिकेला फटकारले आणि फोनवरून मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांना ही बाब कळविण्यास सांगितले.
काही महिन्यांपूर्वी, मूलभूत शिक्षण विभागाने कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांसाठी विलीनीकरण मोहीम सुरू केली, ज्यावर बराच राजकीय वादविवाद झाला. आता शाळांचे एकत्रीकरण पूर्ण झाले आहे, त्यामुळे परिस्थिती सुधारेल अशी आशा होती, परंतु परिस्थिती तशीच आहे.