"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 19:32 IST2025-12-27T19:32:07+5:302025-12-27T19:32:07+5:30
मनरेगाच्या नामांतरावरून काँग्रेस आक्रमक झाली असून ५ जानेवारीपासून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.

"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
Rahul Gandhi: केंद्र सरकारने 'मनरेगा' या ऐतिहासिक योजनेचे नाव बदलून 'विकसित भारत-रोजगार आणि आजीविका मिशन' असे केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, ५ जानेवारी २०२५ पासून देशभर मोठे आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. शनिवारी दिल्लीत पार पडलेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधान मोदींना गांधी आडनावाचा तिरस्कार- मल्लिकार्जुन खरगे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. "पंतप्रधान मोदींना 'गांधी' या नावाशी अडचण आहे, म्हणूनच त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नाव योजनेतून हटवले आहे. मनरेगा ही केवळ योजना नव्हती, तर सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी गरिबांना दिलेला कामाचा अधिकार होता. गरिबांना चिरडण्यासाठी आणि त्यांचे अधिकार हिरावून घेण्यासाठी हा नवा कायदा आणला गेला आहे. अंबानी-अदानीचे खिसे भरणाऱ्या सरकारकडे मजुरांना देण्यासाठी पैसे नाहीत का?" असा सवाल खरगे यांनी केला.
हा तर वन मॅन शो- राहुल गांधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या निर्णयाची तुलना नोटबंदीशी केली. राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधानांनी कोणालाही न विचारता, अगदी मंत्रिमंडळालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला आहे. देशात सध्या वन मॅन शो सुरू असून दोन-तीन अब्जाधीशांच्या फायद्यासाठी गरिबांच्या हक्कावर गदा आणली जात आहे. मनरेगामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळत होते आणि लोकांना किमान वेतनाची हमी होती. आता राज्यांकडून अधिकार आणि पैसा हिसकावून घेऊन केंद्रात सत्तेचे केंद्रीकरण केले जात आहे."
काय आहे नवा कायदा?
महात्मा गांधींचे नाव हटवून 'विकसित भारत-रोजगार आणि आजीविका मिशन'असे नाव देण्यात आले आहे. या योजनेत पूर्वी केंद्राचा वाटा जास्त होता, मात्र आता केंद्र आणि राज्यांनी ६०:४० या प्रमाणात निधी द्यावा, अशी तरतूद आहे. राज्यांवर हा आर्थिक बोजा लादणे म्हणजे संघराज्यात्मक संरचनेवर हल्ला असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. नव्या कायद्यात वर्षाला १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली असली, तरी मूळ अधिकार आधारित साचा केंद्र सरकारने संपवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
५ जानेवारीपासून आंदोलनाची मशाल
काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत मनरेगा बचाओ अभियानाची रूपरेषा ठरवण्यात आली. ५ जानेवारीपासून काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या नामांतराचा आणि गरिबांच्या हक्कासाठी आंदोलन करतील. तसेच, मतदार यादीतून दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक मतदारांची नावे हटवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोपही खरगे यांनी यावेळी केला.