एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 11:56 IST2025-09-16T11:56:02+5:302025-09-16T11:56:22+5:30
पंचायत निवडणुकीच्या आधीच असा एक प्रकार उघडकीस आला, ज्याने खुद्द निवडणूक आयोगाचे अधिकारीही चक्रावून गेले.

एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याच्या बातम्या येत असतात. यावेळी महोबा जिल्ह्यातूनही असेच काहीसे प्रकरण समोर आले आहे. पंचायत निवडणुकीच्या आधीच असा एक प्रकार उघडकीस आला, ज्याने खुद्द निवडणूक आयोगाचे अधिकारीही चक्रावून गेले. येथे एकाच घरात तब्बल ४,२७१ मतदारांची नोंदणी आढळली आहे. विशेष म्हणजे या गावात एकूण मतदारांची संख्या केवळ १६,००० आहे. हा ४,२७१ मतदारांचा घोटाळा राज्य निवडणूक आयोगाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाला आहे.
हे प्रकरण महोबा येथील जैतपुर गावातील आहे. एआयने या गावात एक असा मतदार गट शोधून काढला आहे, ज्यामध्ये एकूण ४,२७१ मतदार आहेत. या सर्व मतदारांचा पत्ता एका तीन खोल्यांचे घर असल्याचे सांगितले आहे. याची सत्यता पडताळण्यासाठी आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बीएलओला घटनास्थळी पाठवले. जेव्हा घरमालकाला याबद्दल माहिती माहिती विचारण्यात आली, तेव्हा ते स्वतःच चकित झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांची नोंद त्यांच्या पत्त्यावर कशी झाली आणि हे कोण लोक आहेत, हे त्यांना स्वतःलाही माहीत नव्हते.
यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे सर्व बोगस मतदार ज्या उमेदवाराला मतदान करतील, त्याचा विजय निश्चित आहे. एवढेच नाही, तर याच मतांच्या जोरावर गावात दोन ग्रामपंचायत सदस्य आणि एक ब्लॉक पंचायत सदस्यसुद्धा निवडले जाऊ शकतात. मात्र, आता निवडणूक आयोगाने घरातील खऱ्या मतदारांची ओळख पटवून इतर सर्व मतदारांना बोगस ठरवले असून, त्यांना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याआधीही महोबा येथे एका पानपट्टीवाल्याच्या पत्त्यावर २४३ बोगस मतदार आढळले होते.
पंचायत निवडणुकीपूर्वी सर्वेक्षण सुरू!
उत्तर प्रदेश राज्य निवडणूक आयोगाने त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीसाठी मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम २० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या अंतर्गत, आयोग एआयच्या मदतीने बोगस मतदारांची ओळख पटवत आहे. एआयने ओळखलेल्या बोगस मतदारांची संबंधित भागातील बीएलओमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. याच प्रक्रियेत महोबाच्या जैतपुर गावातील घर क्रमांक ८०३ मध्ये ४,२७१ मतदारांची नावे आढळून आली. महोबाचे एडीएम कुंवर पंकज यांच्या मते, मतदार यादीतील त्रुटी सुधारल्या जात आहेत.