लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधू आणि तिच्या प्रियकराने पळून जाण्यासाठी प्लॅन आखला होता. ठरल्याप्रमाणे प्रियकर पहाटे तिच्या घरी देखील आला होता. नववधूने सगळ्यांचा डोळा लागल्याचे पाहून पळून जाण्यासाठी तयारी सुरु केली, घरातून बाहेर पडत असतानाच ती पकडली गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
बिहारची राजधानी पटनाच्या खाजेकला पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. तरुणीच्या पतीने पोलिसांत तक्रार दिली आहे. परंतू, त्यापूर्वी नववधूच्या प्रियकराला पकडून यथेच्छ चोप देण्यात आला आहे.
नवरदेवाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांचे लग्न शुक्रवारी कोईलवरच्या एका मंदिरात झाले होते. त्याची पत्नी ही मनेरला राहणारी आहे. लग्नानंतर तिला घरी घेऊन आले. पहिल्या रात्री प्रथेनुसार तो छतावर झोपण्यासाठी गेला. शनिवारी पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान घराजवळ एक तरुण आला, त्याने नवविवाहितेला फोन करून आल्याची माहिती दिली. तो पत्नीचा प्रियकर होता. त्याचा फोन येताच पत्नीने पळून जाण्याची तयारी करू लागली. एवढ्यात सासरच्यांना जाग आली आणि सुनेला बाहेर जाताना एकाने पाहिले. त्याला संशय आल्याने त्याने तिचा पाठलाग केला तर ती एका तरुणासोबत जात होती, घराच्या बाजुलाच तिला आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडण्यात आले.
सासरच्यांनी दोघांनाही पकडून तिच्या प्रियकराला चोप दिला. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांना पोलिस ठाण्यात घेऊन गेले. त्या तरुणाचे नाव विशाल असे आहे. नवविवाहितेने तो तिचा प्रियकर असल्याची कबुली पोलिसांना दिली. शाळेत शिकत असल्यापासून त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत, असेही तिने सांगितले. तसेच आपल्याला प्रियकरासोबतच रहायचे असल्याचे तिने सांगितले. सध्या विशाल पोलिसांच्या ताब्यात आहे. यावर अद्याप काही निर्णय झालेला नाही.