“काश्मिरी पंडितांचे स्थलांतर मोदी सरकारचे अपयश, मीही तेवढाच जबाबदार”: ओमर अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 09:01 AM2022-06-07T09:01:32+5:302022-06-07T09:02:14+5:30

दहशतवादी विचारसरणी खोलवर रुजलेली असून, जम्मू काश्मिरचा विकास हे त्याचे उत्तर नाही, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.

omar abdullah said every single kashmiri pandits who goes back i consider it personal failure | “काश्मिरी पंडितांचे स्थलांतर मोदी सरकारचे अपयश, मीही तेवढाच जबाबदार”: ओमर अब्दुल्ला

“काश्मिरी पंडितांचे स्थलांतर मोदी सरकारचे अपयश, मीही तेवढाच जबाबदार”: ओमर अब्दुल्ला

Next

जम्मू: काश्मिर खोऱ्यात होत असलेल्या टार्गेट किलिंगनंतर तेथील काश्मिरी पंडितांनी (Kashmiri Pandits) पुन्हा एकदा स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. शेकडो काश्मिरी पंडित कुटुंबे काश्मीर खोऱ्यातून जम्मूसह अन्य ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. याप्रकरणी विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर टीका होत असताना, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी यावर भाष्य केले आहे. काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरण हे पंतप्रधानांच्या रोजगार पॅकेजचे अपयश असून, मीही जबाबदार असल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक गोष्टीचे राजकीय फायदे आणि खर्चाच्या दृष्टीने तुलना केली जाऊ नये. यापेक्षा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ही त्यापैकी एक आहे. एखादा नोकरदार काश्मिरी पंडित स्थलांतर करतो, ते माझेही तितकेच अपयश आहे, असे ओमर अब्दुल्ला यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच सध्याची परिस्थिती भाजपला पराभूत करण्याची चांगली संधी देऊ शकते. परंतु जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक गोष्टीकडे राजकीय फायद्याच्या दृष्टिने पाहता कामा नये, असेही अब्दुल्ला यांनी नमूद केले आहे. 

रोजगार देण्यात कमी पडलो, हे माझेही अपयश

काश्मीरमधील हत्यांविरोधात निदर्शने आणि हल्ल्यांपासून संरक्षण करण्यात प्रशासन अपयशी ठरल्यानंतर अनेक काश्मिरी पंडित सरकारी कर्मचाऱ्यांनीही खोऱ्यातून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. याविषयी बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, पंतप्रधान रोजगार पॅकेज आणणाऱ्या आणि त्याची अंमलबजावणी करणाऱ्या सरकारचा मी एक भाग होतो. त्याचे अपयश मी माझे अपयश मानेन. काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांनी आम्ही आमची नोकरी सोडून निघून जाऊ, असे सांगत असताना प्रशासनाचे म्हणणे आहे की, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, आम्ही आणखी एका स्थलांतराची परवानगी देऊ शकत नाही. 

अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर परिस्थिती जैसे थे

५ ऑगस्ट २०१९ रोजी अनुच्छेद ३७० हटवण्यात आले. अनुच्छेद ३७० हे दहशतवाद, हिंसाचार, फुटीरतावादाचे मूळ कारण असल्याचा दावा करण्यात आला. तसेच, जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य करण्यासाठी घटनेतील हा भाग काढून टाकणे आवश्यक होते. हा युक्तिवाद बर्‍याच लोकांनी मान्य केला पण आता तो काढून टाकून जवळपास तीन वर्षे झाली आहेत, पण अद्यापही जम्मू-काश्मीरच्या परिस्थिती बदल झालेला दिसत नाही, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ते इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

जम्मू काश्मीरचा विकास हे दहशतवादाला उत्तर नाही

प्रत्येक सरकारचे दोष असतात पण असे एकही सरकार असे नाही की ज्याच्याबद्दल तुम्ही म्हणू शकाल की त्यांनी विकासाच्या नावाखाली काहीही केले नाही. मला वाटत नाही की बंदुक असलेला एकही अतिरेकी पकडल्यावर असे म्हणेल की मला माझ्या गावाला रस्ता न मिळाल्याने मी दुःखी आहे. त्यांच्या मनात काय चालले आहे ते त्यापेक्षा खूप खोल आहे आणि आम्ही यावर चर्चा करण्यास तयार नाही, असे अब्दुल्ला म्हणाले.
 

Web Title: omar abdullah said every single kashmiri pandits who goes back i consider it personal failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.