Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 02:37 PM2024-05-24T14:37:45+5:302024-05-24T14:38:22+5:30

Rituals: देवघरातील पूजेपासून मंदिरातील सभागृहापर्यंत सर्वत्र घंटेचा वापर का केला जातो, त्यामागील शास्त्रीय कारण जाणून घ्या.

Rituals: Why bells are built in temples? Know why huntan is also used to pay vows! | Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!

Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!

प्रात:काली दूर मंदिरातून घुमणारा सुमधूर घंटानाद किंवा देवघरातील पूजेनंतर झालेला घंटीनाद वातावरणात सकारात्मक लहरी निर्माण करतो. आपल्याप्रमाणे देवांनाही घंटानाद प्रिय असतो. म्हणूनच रोजच्या देवपूजेतही घंटेला पुजेचा मान असतो.

षोडशोपचार पूजेत घंटेची पूजा समाविष्ट असते. त्यासाठी एक श्लोकही म्हटला जातो. 

आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् 
कुर्वे घंटारवं तत्र देवताव्हानलक्षणम् ।।

घंटानादाने देवतेला आवाहन केले जाते. वाईट वृत्तींनी तिथून निघून जावे असा त्यामागचा आशय असतो. 

घंटानाद का करतात?

घंटानादाने चैतन्यात्मक ईश्वरी तत्त्व जागृत होते. वातावरणात असंख्य कंपने निर्माण होतात. सर्वत्र ओतप्रोत भरलेले ईशचैतन्य जागृत होते. मंदिरातील मूर्तीत किंवा देवघरातील देवांमध्ये वेदमंत्रोच्चाराने ईशतत्वाचे आवाहन व प्रतिष्ठा केलेली असते. मंत्रांमध्ये ईशतत्वाशी संपर्क, साक्षात्कार, वशीकरण, आवाहन करण्याचे सामर्थ्य असते. घंटानाद केल्यामुळे वातावरणाला जोड मिळते. 

घंटानादाचे अनेक प्रकार आहे. 

शुक्राचार्यांनी नीतिसार नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यात राजमहालांच्या, मंदिरांच्या प्रवेशद्वारी असलेल्या द्वारपालांनी प्रहरा प्रहराला घंटानाद करावा, असे म्हटले आहे. संकट येण्याची पूर्वसूचना मिळाल्यास मोठ्यामोठ्याने घंटानाद करावा अशी सूचना खिस्ती धर्मस्थळात दिली जाते. हिंदू मंदिरात घंटानाद पूजा अर्चा, होम-हवन, आरती किंवा दर्शनाच्या वेळी केला जातो. तसेच अलीकडे गणेशोत्सवाच्या वाद्यसमुहातही घंटानादावर ताल धरला जातो. 

अन्य धर्मामधील घंटेचा वापर:  हिंदूंशिवाय जैन, बौद्ध, खिस्त धर्मातही घंटानाद केला जातो. ब्रह्मदेश, चीन, जपान, इजिप्त, इटली, फ्रांस, रशिया, इंग्लंडमध्येही घंटा वापरतात. 

नवस फेडण्यासाठीदेखील घंटेचा वापर:  मनोकामना पूर्ण करण्यासाठी सुमुहूर्तावर देवालयात घंटा बांधावी, असे पुराणात सांगितले आहे. नवस पूर्ण व्हावा म्हणून आणि नवस पूर्ण झाला म्हणून अनेक जण मंदिराच्या द्वाराला, कडीला पितळी घंटा बांधतात. आपली आर्त हाक देवापर्यंत पोहोचावी यासाठी भाविक श्रद्धेने घंटा बांधतात. पितृपूजा विधीतही घंटानाद आवश्यक मानला जातो. वास्तुशास्त्रातही घंटेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या राहत्या घरात मधुर आवाजाच्या लहान घंटा टांगून त्यांचा मंगलकारक नाद ऐकावा, असे म्हटले जाते. तेच शास्त्र आपण फेंगश्युई नावे पाळतो. त्याबरोबरच घंटानाद करून पूर्वजांनी सांगितलेल्या सूचनाही अंमलात आणणे सहज शक्य आहे. 

घंटेचे सहा प्रकार : कास्यताल, टाळ, घंटिका (गोलसर), थाळी, विजय घंटा (जयघंटिका), क्षुद्रघंटी (देव्हाऱ्यामध्ये ठेवतात ती) आणि देवळात, सभामंडपात टांगलेली घंटा, असे सहा प्रकार आहेत. 

अशाप्रकारे पूजेत देवाला आवाहन करताना घंटानाद जरूर करावा आणि त्या नादब्रह्मात पूजाविधी पार पाडावेत.

Web Title: Rituals: Why bells are built in temples? Know why huntan is also used to pay vows!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.