"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 02:48 PM2024-05-24T14:48:32+5:302024-05-24T14:49:30+5:30

"काँग्रेसला ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना द्यायचे आहे, पण आम्ही हे कधीच होऊ देणार नाही."

Lok sabha Election : "Poor people even in Brahmin-Bania society, shouldn't they get reservation..?" PM Modi's attack on Congress | "ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात

"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Lok sabha Election : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे, त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोरही वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी सवर्ण समाजातील गरिबांना मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच, काँग्रेसने कधीच त्यांच्याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोपही केला.

भाजपने सवर्ण गरिबांना आरक्षण दिले

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "ब्राह्मण आणि बनिया समाजातदेखील अनेक गरीब आहेत. त्यांच्या मुलांना आरक्षण मिळू नये का? काँग्रेसने याकडे कधीच लक्ष दिले नाही. पण, आमच्या सरकारने गरीब सवर्ण कुटुंबातील मुलांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला तर ओबीसी आरक्षण संपवून मुस्लिमांना द्यायचे आहे. कर्नाटकात काँग्रेसने हेच केले. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला हे आता संपूर्ण देशात लागू करायचे आहे. मात्र, आमच्या सरकारमध्ये असे कधीच होऊ शकत नाही. दलित आणि मागासवर्गीयांचे हक्क हिरावून घेऊ देणार नाही," अशी टीका मोदींनी केली.

ओबीसींचे हक्क हिसकावून घेण्याचे षड्यंत्र
ते पुढे म्हणतात, "ओबीसी आरक्षण कमी करण्याचे ताजे उदाहरण पश्चिम बंगालमध्ये समोर आले आहे. तेथील सरकारने राज्यातील 77 मुस्लिम जातींना ओबीसी प्रमाणपत्र दिले. पण, दोनच दिवसांपूर्वी कोलकाता उच्च न्यायालयाने ते आरक्षण रद्द केले. ओबीसींचे अधिकार लुटून संविधानाची चिरफाड करणे, हे इंडिया आघाडीचे काम आहे. संविधान आणि न्यायालयामुळे त्यांना तसे करता येत नाही, म्हणून त्यांच्यासाठी आता व्होट बँक महत्त्वाची आहे," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला घेरलं
"हिमाचल प्रदेश हे सीमेला लागून असलेले राज्य आहे. हिमाचलच्या लोकांना मजबूत आणि शक्तिशाली सरकारचा अर्थ माहीत आहे. तुमच्यासाठी मी स्वतःचा जीव धोक्यात घालेन, पण तुम्हाला कधीही त्रास होऊ देणार नाहीत. तुम्ही काँग्रेसचा काळ पाहिला आहे. जेव्हा देशात कमकुवत सरकार होते, त्यावेळी पाकिस्तान आमच्या डोक्यावर नाचायचा. कमकुवत काँग्रेस सरकार जगभर विनवणी करत फिरायचे. भारत मातेचा अपमान मी सहन करू शकत नाही, पण काँग्रेस भारत मातेचा अपमान करणंही सोडत नाही. काँग्रेसला भारत माता की जय म्हणण्यात अडचण आहे. त्यांना वंदे मातरम् म्हणण्यात अडचण आहे. पण आता भारत यापुढे जगाकडे भीक मागणार नाही, स्वतःची लढाई स्वबळावर लढेल आणि भारत त्यांना घरात घुसून मारेल," असंही मोदी यावेळी म्हणाले. 

हे देशाचे भविष्य...

"फक्त पूर्वजांच्या नावावर जगणारे हा देश घडवू शकत नाहीत. हा देश त्यांच्यामुळे विकसित होईल, ज्यांनी जमिनीवरुन उठून डोंगराएवढी उंची गाठली आहे. स्टार्टअप सुरू करणारे, आपला सॅटेलाईट अवकाशात पाठवणारे, शेतात ड्रोन उडवणाऱ्या मुली, फायटर प्लेन उडवणाऱ्या तरुणी भारताचे भविष्य आहेत. देशातील महिलांबद्दल काँग्रेसचे काय विचार आहेत, हे सर्व देशाने पाहिले आहे. मंडीचे नाव घेऊन काँग्रेसने कंगनाबद्दल ज्या गोष्टी बोलल्या, त्या अतिशय खालच्या स्तराचा आहेत."

काँग्रेसला असा भारत आवडतो, जिथे...

"मी समान नागरी कायदा करण्याचे वचन दिले आहे. भारताचा नागरिक, मग तो हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन किंवा बौद्ध असो, त्यांच्यासाठी समान नागरी कायदे असले पाहिजेत. मात्र काँग्रेस समान नागरी संहितेला विरोध करत आहे. मुस्लिम पर्सनल लॉच्या नावाखाली काँग्रेस शरियाचे समर्थन करते. तुम्ही अनेक दशकांपासून काँग्रेसची सत्ता पाहिली आहे. काँग्रेसला असा भारत आवडतो, जिथे नागरिक गरिबी, संकट आणि समस्यांनी वेढलेले असतात. म्हणूनच त्यांना देशातील जुनी परिस्थिती परत आणायची आहे. त्यांना देशाच्या विकासात रिव्हर्स गियर लावायचा आहे. काँग्रेस म्हणते की, आम्ही सत्तेत आलो तर 370 परत आणू, CAA रद्द करू, देशाची अण्वस्त्रे संपवू. पण हा मोदी असेपर्यंत काँग्रेसचे मनसूबे पूर्ण होऊ शकणार नाहीत," असा इशाराही त्यांनी यावेळी दिल्या. 

Web Title: Lok sabha Election : "Poor people even in Brahmin-Bania society, shouldn't they get reservation..?" PM Modi's attack on Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.