"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:49 IST2025-11-13T15:48:58+5:302025-11-13T15:49:24+5:30
Omar Abdullah on Delhi Blast: "निरपराध लोकांची अशा प्रकारे निर्दयीपणे हत्या कोणत्याही धर्मात किंवा विचारसरणीत मान्य नाही."

"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
Omar Abdullah on Delhi Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी आहेत. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. तपासात या हल्ल्याचा कट जम्मू-काश्मीरमध्ये शिजल्याचे समोर आले असून, संशयित दहशतवादी डॉक्टर आदिल, मुजम्मिल आणि डॉक्टर उमर हे तिघेही काश्मीरमधील असल्याची माहिती मिळाली आहे.
या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे आणि एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. “जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक व्यक्ती दहशतवादी नाही आणि प्रत्येक काश्मीरी मुसलमान दहशतवाद्यांच्या बाजूने नाही,” अशी प्रतिक्रिया अब्दुल्ला यांनी दिली.
दोषींना कठोर शिक्षा द्या
उमर अब्दुल्ला म्हणाले, “या घटनेची जितकी निंदा केली जाईल, ती कमीच आहे. निरपराध लोकांची अशा प्रकारे निर्दयीपणे हत्या कोणत्याही धर्मात किंवा विचारसरणीत मान्य नाही. दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, पण त्याचबरोबर निर्दोष लोकांना या कारवाईत ओढले जाऊ नये. दोषींना शिक्षा व्हायलाच हवी, पण निरपराधांना वाचवणे ही सरकारची जबाबदारी आहे.”
VIDEO | Jammu and Kashmir CM Omar Abdullah speaking on the recent blast near Delhi's Red Fort, says, "Not every resident of Jammu and Kashmir is a terrorist. It is only a handful of people who have always tried to disturb the peace and brotherhood in Kashmir."
— Press Trust of India (@PTI_News) November 13, 2025
(Full video… pic.twitter.com/PrntfxDUdP
संपूर्ण काश्मीरला दहशतवादाशी जोडणे चुकीचे
दहशतवादी हल्ल्यांचा जम्मू-काश्मीरशी संबंध जोडण्याच्या प्रवृत्तीवर टीका करताना अब्दुल्ला म्हणाले, “आपण जेव्हा प्रत्येक काश्मीरी मुसलमानकडे एकाच नजरेने पाहायला लागतो आणि असे दाखवू लागतो की, प्रत्येक काश्मीरी दहशतवादी आहे, तेव्हा राज्याबद्दल वेगळी भावना निर्माण होऊ शकते. हे काही मोजके लोक आहेत जे राज्यातील शांतता आणि बंधुता बिघडवण्याचा प्रयत्न करतात.”
शिक्षित लोकही दहशतवादाकडे वळतात
मुख्यमंत्र्यांनी शिक्षण आणि दहशतवाद यांच्यातील नातेसंबंधावरही भाष्य केले. ते म्हणाले, “हे कोठे लिहिले आहे की, सुशिक्षित लोक दहशतवादात सहभागी होत नाहीत? आपण याआधी विद्यापीठातील प्राध्यापकांनाही अशा क्रियाकलापांत गुंतलेले पाहिले आहे. काश्मीर विद्यापीठातील एका असोसिएट प्राध्यापकाला नोकरीतून काढून टाकले, पण त्यावर पुढील चौकशी काय झाली? जर सरकारला वाटत होते की, तो दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेला आहे, तर पुरावे न्यायालयात का सादर केले नाहीत? फक्त नोकरीतून काढणे हा उपाय नाही,” असेही ते यावेळी म्हणाले.