ना पुस्तकं, ना कोचिंग, ना इंटरनेट... गरीब शेतकऱ्याच्या मुलाने कशी पास केली NEET परीक्षा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 19:26 IST2024-12-10T19:25:21+5:302024-12-10T19:26:45+5:30
सनातन प्रधान ओडिशातील ताडीमाहा नावाच्या दुर्गम गावातील आहे. तेथील तरुणांना ना करिअरच्या अनेक संधी आहेत ना इंटरनेटची उपलब्धता.

फोटो - hindi.news18
NEET साठी तयारी करणं ही काही सोपी गोष्ट नाही. काही तरुणांना NEET उत्तीर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. NEET ची तयारी करण्यासाठी, पुस्तकं, कोचिंग आणि ऑनलाईन स्टडी मटेरिअल आवश्यक आहे. पण या तीन गोष्टी नसताना ओडिशातील एका तरुणाने पहिल्याच प्रयत्नात NEET परीक्षा उत्तीर्ण केली. ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील १९ वर्षीय विद्यार्थी सनातन प्रधानने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
सनातन प्रधान ओडिशातील ताडीमाहा नावाच्या दुर्गम गावातील आहे. तेथील तरुणांना ना करिअरच्या अनेक संधी आहेत ना इंटरनेटची उपलब्धता. त्यांचे वडील कनेश्वर प्रधान हे छोटे शेतकरी आहेत. यावरून त्यांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज बांधता येतो. सनातन प्रधान ना कोचिंगला जाऊ शकला, ना त्याच्याकडे विशेष साधनं होती. उधार घेतलेली पुस्तकं आणि जिद्द याच्या बळावर त्याने पहिल्याच प्रयत्नात NEET परीक्षा उत्तीर्ण केली.
सनातन प्रधानने दारिंगबाडीच्या सरकारी शाळेतून दहावीची बोर्डाची परीक्षा दिली होती. यानंतर तो बारावीच्या अभ्यासासाठी खलीकोट ज्युनिअर कॉलेज, बेरहामपूर येथे गेला. वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET ची तयारी करण्यासाठी सनातन प्रधान त्याच्या गावी परतला होता. मात्र, येथे त्याला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. त्याच्या गावात इंटरनेट कनेक्शन नाही. पण यामुळे तो थांबला नाही. इंटरनेटसाठी, तो दररोज ३ किमी ट्रेक करायचा आणि जवळच्या टेकड्या चढायचा.
सनातन प्रधान दररोज काही तास टेकडीवर जाऊन ऑनलाइन स्टडी मटेरियल डाउनलोड करायचा. मग गावी परत आल्यानंतर अभ्यास करून NEET ची तयारी करायचा. त्याचा स्वतःवर विश्वास होता. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने NEET परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या संघर्षकथेचं यशोगाथेत रूपांतर केलं. आता तो एमकेसीजी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस करत आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाल्यानंतर त्याला दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांवर उपचार करायचे आहेत.