Odisha Train Accident : चमत्कार! वरून पडत होती बोगी अन् आईला सुचला एकमेव मार्ग; अशी वाचवली पोटची 3 मुलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 17:14 IST2023-06-04T17:14:02+5:302023-06-04T17:14:47+5:30
...तेवढ्यात आईचे प्रेझेन्स ऑफ माइंड कामी आले आणि चमत्कार घडला!

Odisha Train Accident : चमत्कार! वरून पडत होती बोगी अन् आईला सुचला एकमेव मार्ग; अशी वाचवली पोटची 3 मुलं
बालासोर - ओडिशातील बालासोर येथे झालेल्या तीन रेल्वे गाड्यांच्या अपघातात तब्बल 270 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातच, एका महिलेने ज्या पद्धतीने आपल्या मुलांना वाचविले, त्याचीही जबरदस्त चर्चा होत आहे. खरे तर ही आई आपल्या सदसद् विवेकबुद्धीने मुलं आणि मृत्यूमध्ये ढालीसारखी उभी राहिली. या अपघातात अनेक बोग्यांचा पूर्णपणे चक्काचूर झाला. दरम्यान एका चक्काचूर झालेल्या बोगीचा काही भाग त्यांच्यावर कोसळणार होता. तेवढ्यात आईचे प्रेझेन्स ऑफ माइंड कामी आले आणि चमत्कार घडला.
मला वाटले होते आता वाचणार नाही...-
जेव्हा ट्रेन एकमेकांवर आदळल्या तेव्हा अक्षरश: बहिरा करणारा आवाज झाला आणि प्रचंड धूर उठला. ही परिस्थिती समजायला 45 वर्षीय सीता दास यांना वेळ लागला नाही. सीता दास यांनी आपल्या दोन मुलींना आणि एका मुलाला खिडकीतून बाहेर फेकले. रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला शेतं होती. मुलांना वाचवण्यासाठी हीच योग्य जागा आहे असे त्यांना वाटले. सीता सांगतात, 'पहिल्या काही मिनिटांसाठी मला वाटले, मी जगले नाही तर लोक माझ्या मुलांचा जीव वाचवतील. माझे पती जेथे अडकले होते. त्या ठिकाणापासून मी फार दूर नव्हते.
अपघातानंतर संपूर्ण कुटुंब सुरक्षित -
सीता आणि त्यांचे पती किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातातून हे दाम्पत्य आणि त्यांच्या मुलांचा जीव वाचणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. हे कुटुंब चेन्नईला जात होते. तेथे सीता दास यांचे पती नंदू दास प्लंबर म्हणून काम करतात. ओडिशातील बालासोरजवळ कोरोमंडल, शालीमार आणि मालगाडी यांच्यात झालेल्या या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.