Odisha Train Accident: '26/11 वेळी NSG ला मुंबईत यायला 10 तास लागले', हरदीप सिंग पुरींचा काँग्रेसवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 19:52 IST2023-06-05T19:51:45+5:302023-06-05T19:52:43+5:30
Coromandel Express Derail: कोरोमंडल ट्रेन अपघातानंतर काँग्रेसकडून रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

Odisha Train Accident: '26/11 वेळी NSG ला मुंबईत यायला 10 तास लागले', हरदीप सिंग पुरींचा काँग्रेसवर हल्लाबोल
Hardeep Singh Puri : ओडिशातील बालासोरमध्ये कोरोमंडल ट्रेनचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विरोधकांकडून रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावरुन केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असलेल्या पुरी यांनी 26/11 मुंबई हल्ल्याचा उल्लेख केला.
सोमवारी(5 जून) माध्यमांशी बोलताना पुरी म्हणाले की, "26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर NSG ला मुंबईत पोहोचण्यासाठी 10 तासांपेक्षा जास्त वेळ लागला होता. ट्रेन दुर्घटनेनंतर पंतप्रधानांनी तात्काळ बालासोर ट्रेन अपघात स्थळाला भेट दिली. तीन केंद्रीय मंत्री देखील होते. अपघातानंतर 51 तासांत रेल्वे रुळ पूर्ववत करण्यात आला."
विरोधी पक्षांच्या बैठकीवरुन हरदीप सिंग पुरी यांनी टीका केली. ते म्हणाले, "आम्हाला एक जबाबदार विरोधी पक्ष हवा आहे, पण ही वेगळ्या प्रकारची विरोधी एकजूट होत आहे. यापैकी अर्धे ते आहेत, ज्यांना नेतृत्व हवंय आणि अर्धे ते आहेत जे कोणाच्यातरी विरोधात आहेत," अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.
ओडिशा रेल्वे अपघातात 275 ठार
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी (2 जून) भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पीएम मोदींनी अपघातस्थळाची पाहणी केली आणि काही जखमींची रुग्णालयात जाऊनही भेट घेतली. यासोबतच अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही दिले.
रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
या अपघातानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घटनेपासून भाजप पळू शकत नाही. भाजपने याची जबाबदारी घ्यावी, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात व्यस्त आहेत, पण रेल्वे सुरक्षेकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला.