Odisha Railway Accident: मला माझ्या भावाशी बोलू द्या... शेवटची इच्छा पूर्ण होताच ट्रेनमध्ये अडकलेल्या तरुणानं सोडले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 17:03 IST2023-06-04T17:03:24+5:302023-06-04T17:03:37+5:30
Odisha Railway Accident: कदाचित आपल्याकडे शेवटची काही मिनिटेच शिल्लक आहेत, याची जाणीव त्याला झाली. त्यामुळेच त्याने बचाव पथकातील व्यक्तीला छोट्या भावाशी संपर्क साधून देण्याची विनंती केली.

Odisha Railway Accident: मला माझ्या भावाशी बोलू द्या... शेवटची इच्छा पूर्ण होताच ट्रेनमध्ये अडकलेल्या तरुणानं सोडले प्राण
ओदिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात जवळपास २८० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आता या अपघातादरम्याच्या करुण कहाण्या जगासमोर येत आहेत. अपघातग्रस्त कोरोमंडल एक्स्प्रेसमधून ललित ऋषिदेव नावाचा तरुणही प्रवाक करत होता. जेव्हा तो ट्रेनमध्ये चढला तेव्हा हा त्याचा शेवटचा प्रवास आहे, याची त्याला कल्पनाही नव्हती. बिहारमधील पुर्णिया येथे राहणाऱ्या ललितला चेन्नईमध्ये मजुरीचं काम मिळालं होतं.
ललित हा नोकरीसाठी घरातून बाहेर पडला. पण तो चेन्नईला पोहोचू शकला नाही. वाटेतच त्याला मृत्यूने गाठले. ओदिशामधील बालासोर येथे झालेल्या अपघातामध्ये ललित गंभीर जखमी झाला होता. जेव्हा त्याला वाचवण्यासाठी बचाव पथक त्याच्यापर्यंत पोहोचले, तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. कदाचित आपल्याकडे शेवटची काही मिनिटेच शिल्लक आहेत, याची जाणीव त्याला झाली. त्यामुळेच त्याने बचाव पथकातील व्यक्तीला छोट्या भावाशी संपर्क साधून देण्याची विनंती केली.
तेव्हा बचाव पथकातील व्यक्तींनी मोबाईल शोधण्यास सुरुवात केली. लवकरच ललितचा मोबाईल सापडला. त्यानंतर त्याचा भाऊ मिथुन ऋषिदेव याला फोन लावण्यात आला. फोनवर ललितने काही मिनिटे त्याच्यासोबत संवाद साधला. त्यानंतर ललितचा मृत्यू झाला. भावाचा अचानक मृत्यू झाल्याने मिथुनलाही शोक अनावर झाला. कुटुंबातील इतर व्यक्तींनाही मोठा धक्का बसला.
दरम्यान, ललिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचे कुटुंबीय बालासोरमध्ये पोहोचले. तेव्हा ललितचा मृतदेह शोधण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. खूप शोधाशोध केल्यानंतर ललितचा मृतदेह सापडला. मुलाचा मृतदेह पाहून आई-वडील बेशुद्ध झाले. दरम्यान, ललितसोबत आणखी तिघेजण होते. मात्र त्यातील दोन जणांचा या रेल्वे अपघातात मृत्यू झाला.