दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 21:42 IST2025-09-10T21:41:19+5:302025-09-10T21:42:27+5:30
Odisha News: घरातील वृद्धांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
Odisha News: ओडिशातील गंजम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ८० वर्षीय वृद्धासोबत दात घासताना अशी घटना घडली, ज्याचा कुणी विचारही केला नसेल. झाडाच्या काडीने दात घासताना काडी थेट वृद्धाच्या अन्ननलिकेत अडकली. यामुळे त्या वृद्धाला ७ दिवस उपाशी राहावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, नटंगा गावातीस कामराजू नायक दररोजप्रमाणे झाडाच्या गाडीने दात घासत होते, पण काडी त्यांच्या थेट अन्ननलिकेत अडकली. त्यानंतर कामराजूंना छातीत आणि पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. कुटुंबाने सुरुवातीला अनेक घरगुती उपाय करून पाहिले, परंतु काडी बाहेर न आल्यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिकट झाली. पहिल्या दिवसापासूनच त्यांना अन्न गिळण्यास त्रास होत होता. हळूहळू त्यांची प्रकृती अशी झाली की, त्यांना एक घासही खाता येत नव्हता.
वृद्धत्वामुळे शस्त्रक्रिया धोकादायक
अनेक वैद्यकीय केंद्रांमध्ये दाखवल्यानंतर कामराजूंच्या कुटुंबीयांनी त्यांना ब्रह्मपूर येथील एमकेसीजी मेडिकल कॉलेजमध्ये नेले. येथे ईएनटी विभागाचे डॉ. संजीत कुमार मिश्रा आणि त्यांच्या टीमने ताबडतोब त्यांची तपासणी केली. तपासणीत असे दिसून आले की, काडीचा तुकडा अन्ननलिकेत अडकला होता. कामराजू यांच्या वृद्धापकाळामुळे शस्त्रक्रिया धोकादायक होती. त्यांना उच्च रक्तदाब आणि इतर अनेक आरोग्य समस्या होत्या. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी उपचारांचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक केले.
'एसोफॅगोस्कोपी' तंत्राचा वापर केला
९ डॉक्टरांच्या टीमने 'एसोफॅगोस्कोपी' नावाची तंत्राचा वापर केला. या प्रक्रियेत घशात एक विशेष नळी टाकली जाते, ज्याद्वारे आतल्या गोष्टी पाहता काढता येतात. या नळीद्वारे हळूहळू दाब देऊन काडी बाहेर काढण्यात आली. ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाल्यानंतर हळुहळू कामराजू नायक यांची प्रकृती सुधारली.
डॉक्टरांनी काय म्हटले?
डॉ. मिश्रा यांच्या मते, वृद्धाचे वय आणि स्थिती लक्षात घेता ही एक अतिशय आव्हानात्मक केस होती. शस्त्रक्रियेपूर्वी त्यांचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास लक्षात ठेवून ऑपरेशन करण्यात आले. या घटनेवरुन असे दिसून येते की, वृद्धांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.