धनुष्यातून बाण सोडून केली वृद्धेची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 13:25 IST2025-02-02T13:24:36+5:302025-02-02T13:25:17+5:30
Odisha Crime News: ओदिशामधील ढेंकनाल जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धेमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने धनुष्यातून बाण सोडून आपल्या ७० वर्षीय काकीची हत्या केली.

धनुष्यातून बाण सोडून केली वृद्धेची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण
ओदिशामधील ढेंकनाल जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धेमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने धनुष्यातून बाण सोडून आपल्या ७० वर्षीय काकीची हत्या केली. काकी जादूटोणा करत असल्याचा संशय या तरुणाला होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घतला असून आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही धक्कादायक घटना ढेंकनाल जिल्ह्यातील पिथलधुआ गावामध्ये घडली आहे. येथील दामोदर पूर्ती याला त्याची ७० वर्षांची वृद्ध काकी सुनहू सिंकू ही जादूटोणा करते, असा संशय होता. त्यावरून संतापलेल्या दामोदर याने काकीच्या घरी जाऊन तिच्यावर धनुष्यातून बाण सोडला. हा बाण या वृद्ध महिलेच्या छातीत जाऊन घुसला. घरात असलेल्या सुनहू हिच्या पती आणि मुलाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आलं नाही. दरम्यान, आरोपी दामोदर हा घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती आजूबाजूला पसरताच घटनास्थळावर ग्रामस्थांनी गर्दी केली. तसेच याबाबतची खबर पोलिसांना देण्यात आली.
हत्येची माहिती मिळताच कामाख्यानगरचे एसडीपीओ ज्ञानरंजन मिश्रा आणि कंकडाहद पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी दामोदर याला अटक केली. तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेला धनुष्य आणि बाण जप्त केला.
प्राथमिक तपासामध्ये मृत महिला आणि आरोपीमध्ये आधी कुठलाही वाद नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. मात्र चौकशीदरम्यान दामोदर हा माझ्या आईवर जादूटोण्याचा संशय घेत होता. सुनहू हिने केलेल्या जादुटोण्यामुळे आपली तब्येत सारखी बिघडत असल्याचे दामोदर याला वाटायचे. या अंधश्रद्धेमधूनच त्याने हे कृत्य केले, असे मृत सुनहू हिच्या मुलीने पोलिसांना सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे, तसेच पुढील तपास सुरू आहे.