निष्काळजीपणाचा कळस! मध्यान्ह भोजनात सापडली पाल; १०० मुलं पडली आजारी, घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 12:28 IST2024-08-09T12:16:42+5:302024-08-09T12:28:31+5:30
ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील सोरो ब्लॉकमधील सिरापूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर शाळेतील तब्बल १०० मुलं आजारी पडल्याची घटना समोर आली आहे.

निष्काळजीपणाचा कळस! मध्यान्ह भोजनात सापडली पाल; १०० मुलं पडली आजारी, घटनेने खळबळ
ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील सोरो ब्लॉकमधील सिरापूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर शाळेतील तब्बल १०० मुलं आजारी पडल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी परिसरातील उदयनारायण नोडल शाळेतील १०० विद्यार्थी आजारी पडले. मध्यान्ह भोजनात पाल सापडल्याचं म्हटलं जात आहे.
रिपोर्टनुसार, विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात आलं होतं. जेवण सुरू झाल्यानंतर काही वेळातच एका मुलाने त्यात पाल दिसल्याचं सांगितलं. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. शाळेच्या अधिकाऱ्यांनी अन्न वाटप थांबवलं आणि विद्यार्थ्यांना जेवू नका असं सांगितलं.
अनेक विद्यार्थ्यांना यानंतर पोटदुखी, छातीत दुखणे अशा समस्या होऊ लागल्या. यानंतर शिक्षकांनी रुग्णवाहिका आणि इतर वाहनांच्या मदतीने विद्यार्थ्यांना सोरो कम्युनिटी हेल्थ सेंटर (CHC) येथे नेले. तसेच सीएचसीच्या वैद्यकीय पथकाने शाळेला भेट देऊन मुलांवर उपचार केले. मुलांना जेवल्यानंतर उलट्या झाल्या. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मला अशी माहिती मिळाली आहे की उदयनारायण नोडल शाळेतील काही विद्यार्थी मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर आजारी पडले आहेत. काही पालक आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे, तेथे गेल्यानंतर मला कळलं की दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. ५० हून अधिक विद्यार्थी येथे दाखल आहेत."
शाळेच्या मुख्याध्यापिका कविता सोरेन म्हणाल्या की , "मला मील इन्चार्जचा फोन आला की मध्यान्ह भोजनात एक पाल सापडली आहे, त्यानंतर मी ताबडतोब तेथे पोहोचले आणि जेवण बंद करण्याची ऑर्डर दिली. आत्तापर्यंत १०० हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल आहेत. मी माझ्या शाळेतील इतर कर्मचाऱ्यांसह तेथे जाण्याच्या तयारीत आहे."