चिप्सच्या पाकिटाचा भीषण स्फोट; ८ वर्षांच्या मुलाने गमावला डोळा, घरात नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:48 IST2026-01-13T13:47:48+5:302026-01-13T13:48:47+5:30
चिप्सच्या पाकिटात झालेल्या स्फोटामुळे एका आठ वर्षांच्या मुलाचं आयुष्य कायमचं बदललं आहे.

फोटो - आजतक
ओडिशाच्या बलांगीर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे चिप्सच्या पाकिटात झालेल्या स्फोटामुळे एका आठ वर्षांच्या मुलाचं आयुष्य कायमचं बदललं आहे. टिटलागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शागरदघाट गावात सोमवारी हा अपघात झाला, ज्यामध्ये एका मुलाने आपल्या एका डोळ्याची दृष्टी कायमची गमावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लब हरपाल यांच्या मुलासोबत ही घटना घडली आहे. तो गावातील एका दुकानातून चिप्सचे पाकीट विकत घेऊन घरी आला होता. संध्याकाळी ट्युशनवरून परतल्यानंतर तो चिप्स खाणार होता. त्याच वेळी त्याची आई भानुमती हरपाल स्वयंपाकघरात जेवण बनवत होत्या. गॅस सुरू होता आणि त्या काही वेळासाठी पाणी आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या.
असं सांगितलं जात आहे की, याच दरम्यान मुलगा हातामध्ये चिप्सचे पाकीट घेऊन गॅसजवळ गेला. अचानक त्याच्या हातातील पाकीट निसटून आगीच्या संपर्कात आलं आणि मोठ्या आवाजासह त्याचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा थेट परिणाम मुलाच्या चेहऱ्यावर झाला. यामुळे मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा डोळा पूर्णपणे निकामी झाला.
मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून आई स्वयंपाकघरात धावत आली, तेव्हा त्यांना मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. नातेवाईकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितलं की, डोळ्याची जखम इतकी खोल आहे की डोळा वाचवता येणार नाही आणि मुलगा आता त्या डोळ्याने कधीच पाहू शकणार नाही. हे ऐकताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
आई भानुमती हरपाल यांनी सांगितलं की, त्यांनी आपल्या मुलाला बिस्किट आणण्यासाठी पैसे दिले होते, मात्र तो चिप्स घेऊन आला. मुलांसाठी बनवलेली ही उत्पादनं इतकी धोकादायक कशी असू शकतात, की आगीच्या संपर्कात येताच त्यांचा बॉम्बसारखा स्फोट व्हावा, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी टिटलागड पोलीस ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, उत्पादनाचा दर्जा, पाकिटात वापरलेले साहित्य आणि स्फोटाचे नेमकं कारण याची सखोल चौकशी केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं.