Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:06 IST2025-09-16T15:04:15+5:302025-09-16T15:06:51+5:30
Who Is Nupur Bora: आसामच्या नागरी सेवेतील अधिकारी नुपूर बोरा यांना बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
आसामच्या नागरी सेवेतील अधिकारी नुपूर बोरा यांना बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्या घरातून तब्बल ९२ लाख रुपये रोख आणि सुमारे २ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारांमुळे त्या गेल्या सहा महिन्यांपासून कायदेशीर देखरेखीखाली होत्या. बोरा यांनी पैशांसाठी हिंदूंच्या जमिनी संशयास्पद लोकांना विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
नुपूर बोरा या गोलाघाट जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांनी २०१९ मध्ये एसीएस अधिकारी म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली होती. त्या सध्या कामरूप जिल्ह्यातील गोरोईम्डी येथे सर्कल ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी घेतली असून, नागरी सेवेत येण्यापूर्वी त्या प्राध्यापिका म्हणूनही काम करत होत्या.
नुपूर बोरा यांनी आपली प्रशासकीय कारकीर्द कार्बी आंगलोंगमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून सुरू केली. फक्त सहा वर्षांच्या सेवेत त्यांनी प्रचंड संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एसपी रोज कलिता यांनी सांगितले की, बोरा यांच्यावर अनेक गंभीर आरोप असून, तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यावर आणखी रोख रक्कम आणि इतर वस्तू जप्त होण्याची शक्यता आहे. कृषक मुक्ती संग्राम समितीने (KMSS) बोरा यांच्याविरुद्ध तक्रार केली. त्यांनी जमिनीशी संबंधित सेवांसाठी ‘रेट कार्ड’ तयार केले असल्याचा आरोप समितीने केला. या घटनेमुळे राज्य प्रशासनात मोठी खळबळ उडाली.