महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 06:01 IST2025-07-26T05:59:28+5:302025-07-26T06:01:06+5:30

२०वा हप्ता लवकरच; आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ३७,००० कोटी  

Number of 'PM-KISAN' beneficiaries increases fourfold in Maharashtra! | महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क


मुंबई/नवी दिल्ली : शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान)च्या २० व्या हप्त्याची वाट पाहत असताना, महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात २१.८४ लाखांवरून १९ व्या हप्त्यात ९३.२८ लाखापर्यंत लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये वाटप करण्यात आलेला पहिला हप्ता राज्यातील २१.८४ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला. त्यात सुमारे ४३७ कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे देण्यात आले. २०२५ मध्ये १९ व्या हप्त्यापर्यंत लाभार्थ्यांची संख्या ९३.२८ लाखांपर्यंत वाढली. यात २,०१३ कोटी रुपये वाटप करण्यात आले. म्हणजेच लाभार्थ्यांत चारपट वाढ झाली आणि वितरित निधीमध्ये सुमारे पाचपट वाढ झाली. वाढलेले डिजिटायझेशन, जमिनीची सुधारित नोंद पडताळणी व मोहिमेबद्दलची व्यापक जागरूकता, यामुळे ही वाढ झाली. अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यातील लाभार्थी क्षेत्रात ग्रामीण-शहरी अशी स्पष्ट तफावत दिसून येते. 

सर्वाधिक लाभार्थी?
सोलापूर, कोल्हापूर व अहिल्यानगरसारख्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. तर ठाणे आणि पालघरसारखे शहरी-केंद्रित भाग खूपच मागे आहेत.

पीएम-किसान सन्मान निधी योजनेचे टॉप टेन लाभार्थी जिल्हे
जिल्हा    लाभार्थ्यांची     वितरित 
संख्या                  रक्कम   
 

सोलापूर              ५,०५,१७२    ११०.२२ 
अहिल्यानगर       ५,५२,२४६    ११७.२७ 
कोल्हापूर             ४,८५,२३९    १०८.९६ 
सातारा                 ४,५३,००७    ९९.८ 
पुणे                      ४,४६,५४५    ९४.५८ 
नाशिक                ४,४२,६०६    ९४.०२ 
जळगाव               ४,०९,५१७    ९०.४४ 
सांगली                  ४,००,३७४    ८४.२ 
नांदेड                    ३,८६,२९२    ८०.४२ 
बीड                      ३,८०,६९९    ८३.४९ 
एकूण महाराष्ट्र       ९३,२८,२८६    २,०१३.५१

पीएम-किसान लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा आधार
ठाणे जिल्ह्यात राज्यातील सर्वांत कमी फक्त ७४,०५१ लाभार्थ्यांची नोंद आहे. पालघरमध्ये आदिवासी व ग्रामीण लोकसंख्या लक्षणीय असूनही १.०१ लाख लाभार्थी नोंदले गेले आहेत. याउलट सोलापूर ५.०५ लाख लाभार्थ्यांसह अव्वल  आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १९ व्या हप्त्यात ११० कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे.

आजवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३७,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली. त्यामुळे पीएम-किसान लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनला आहे. आता आदिवासी आणि दुर्गम भागांतील शेतकऱ्यांचा यात समावेश करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

Web Title: Number of 'PM-KISAN' beneficiaries increases fourfold in Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.