तुम्ही 'त्यांचे' वारसदार शोभता; राहुल गांधींना भाजपानं सुचवलं दुसरं आडनाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 04:12 PM2019-12-14T16:12:29+5:302019-12-14T16:15:06+5:30

राहुल गांधींविरोधात भाजपाची आक्रमक भूमिका 

Not Savarkar but call yourself Rahul Jinnah says bjp leader Narasimha Rao | तुम्ही 'त्यांचे' वारसदार शोभता; राहुल गांधींना भाजपानं सुचवलं दुसरं आडनाव

तुम्ही 'त्यांचे' वारसदार शोभता; राहुल गांधींना भाजपानं सुचवलं दुसरं आडनाव

Next

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत भारत बचाओ रॅली काढली. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनीभाजपावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी रेप इन इंडिया विधानाबद्दल माफी मागण्यास स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला. माझं नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. त्यामुळे कदापि माफी मागणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजपा नेत्यांनी राहुल यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

भाजपाचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी राहुल यांना नवं आडनाव सुचवलं आहे. राहुल यांनी जिन्ना आडनाव लावावं, असा सल्ला त्यांनी दिला. 'तुम्हाला गांधी नव्हे, जिन्ना आडनाव जास्त शोभून दिसेल. मुस्लिमांच्या लांगुलचालनाच्या राजकारणामुळे आणि मानसिकतेमुळे तुम्ही सावरकरांचे नाहीत, तर मोहम्मद अली जिन्नांचे योग्य वारसदार शोभता,' अशा शब्दांमध्ये राव यांनी राहुल यांच्यावर पलटवार केला. राव यांनी त्यांच्या ट्विटमध्ये काँग्रेसलादेखील टॅग केलं आहे.


 
तत्पूर्वी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीदेखील राहुल गांधींवर शरसंधान साधलं. 'वीर सावरकर खरेखुरे देशभक्त होते. आडनाव उधार घेऊन कोणी गांधी होत नाही, कोणी देशभक्त होऊ शकत नाही. देशभक्त होण्यासाठी धमन्यांमध्ये शुद्ध हिंदुस्तानी रक्त असायला हवं. वेश बदलून अनेकांनी देशाला लुटलं आहे. मात्र आता तसं होणार नाही. हे तीनजण कोण आहेत? हे तिघे देशाचे सामान्य नागरिक आहेत का?,' असे प्रश्न उपस्थित करताना गिरीराज यांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींचा फोटो ट्विट केला आहे. 



राहुल गांधींनी देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांवरुन झारखंडमधील सभेतून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता. मोदी म्हणाले होते मेक इन इंडिया. मात्र जिथे पाहावं तिथं रेप इन इंडिया दिसत आहे, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं होतं. त्यावरुन काल संसदेत गदारोळ झाला. राहुल यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली. मात्र राहुल यांनी माफी मागण्यास नकार दिला.



गेल्या काही दिवसांपासून ईशान्य भारत धगधगतो आहे. आर्थिक मंदी, बेरोजगारीचे प्रश्न आ वासून उभे आहेत. यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून वाद निर्माण केला जात आहे. मात्र मी माझ्या विधानावर ठाम आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, असं म्हणत राहुल यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी दिल्लीचा उल्लेख रेप कॅपिटल असा केला होता, याची आठवणदेखील त्यांनी करुन दिली. 

Web Title: Not Savarkar but call yourself Rahul Jinnah says bjp leader Narasimha Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.