पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ५ देशांच्या दौऱ्यावर आहेत. आता त्यांच्या ब्राझील दौऱ्यादरम्यान त्यांना या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात 'ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस'ने सन्मानित करण्यात आले आहे. ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी पंतप्रधान मोदींना द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात आणि प्रमुख जागतिक व्यासपीठांवर भारत-ब्राझील सहकार्य वाढवण्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हा सन्मान प्रदान केला.
ब्राझीलचा सर्वोच्च नागरी सन्मान स्वीकारल्यानंतर, पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष लूला यांच्याशी झालेल्या प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चेनंतर म्हटले की, "आज ब्राझीलच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणे हा केवळ माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे. मी राष्ट्रपती लूला यांचे, ब्राझील सरकार आणि ब्राझीलच्या लोकांचे मनापासून आभार मानतो."
ब्राझीलनंतर 'या' देशाला देणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परदेशी सरकारने दिलेला हा २६ वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. ब्राझीलचे अध्यक्ष लूला यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी ब्राझीलच्या दौऱ्यावर होते. ब्राझील दौरा संपल्यानंतर, पंतप्रधान मोदी त्यांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यासाठी रवाना होतील. ब्राझीलहून ते आफ्रिकन देश नामिबियाला भेट देतील.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष लूला यांची काल ब्राझिलियातील अल्वोराडा पॅलेसमध्ये भेट झाली. तत्पूर्वी, काल ब्राझीलमधील अल्वोराडा पॅलेसमध्ये पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष लूला यांची भेट घेतली आणि रिओ डी जानेरो येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहिले. ब्रिक्स शिखर परिषदेव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदींनी अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेतल्या.
दहशतवादाविरुद्ध आमचा दृष्टिकोन समान! या दौऱ्या दरम्यान राष्ट्राध्यक्ष लूला यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, "दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आमचा दृष्टिकोन समान आहे. दहशतवादाच्या बाबतीत दुटप्पीपणाला स्थान नाही यावर आमचा ठाम विश्वास आहे. आम्ही दहशतवादाचा आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांचाही तीव्र विरोध करतो."
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल ब्राझीलने दाखवली एकता!या बैठकीत पंतप्रधान मोदींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल आणि भारतीय जनतेसोबत एकता व्यक्त केल्याबद्दल राष्ट्रपती लूला यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा म्हटले की, भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढण्याच्या आपल्या निर्धारावर ठाम आहे. तर, ब्राझीलचे राष्ट्रपती लूला यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आपला पूर्ण पाठिंबा असल्याचेही सांगितले.