दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:54 IST2025-11-12T15:52:46+5:302025-11-12T15:54:18+5:30
Delhi Blast News Updates: दिल्ली प्रकरणात नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत असल्याचे म्हटले जात आहे.

दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
Delhi Blast News Updates: लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या कार स्फोटाचा तपास NIA कडे सोपवण्यात आला आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटक भरलेली कार चालवणारा व्यक्ती कश्मीरच्या पुलवामातील डॉक्टर उमर नबी असल्याची शंका आहे. यानंतर या प्रकरणातील चौकशीतून अनेक नवीन तसेच धक्कादायक खुलासे समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहेत. दिल्ली कार स्फोटानंतर संपूर्ण देशभरात अलर्ट देण्यात आला असून, अनेक ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
काही मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसांपासून या स्फोटाची योजना आखली जात होती. दिल्ली लाल किल्ला हे त्यांचे टार्गेट नसून त्यांची योजना यापेक्षाही कितीतरी पट भयंकर होती, असे चौकशीतून पुढे येत आहे. त्यांना जास्तीत जास्त लोकांना नुकसान पोहोचवायचे होते. त्यांचे टार्गेट अयोध्या आणि काशी होते. दिल्लीतील स्फोट घाईत झाल्याची माहितीही समोर येत आहे. मोठा कट संशयित आरोपींकडून आखण्यात आला होता. या स्फोटात वापरलेले साहित्य बांगलादेश आणि नेपाळच्या मार्गे भारतात आणल्याचे म्हटले जात आहे.
हल्ला होण्याआधीच धरपकड
हा स्फोट घडायच्या काही तास आधीच पोलिसांनी ८ जणांना अटक केली होती, त्यात ३ डॉक्टरांचा समावेश आहे आणि अमोनियम नायट्रेट, डिटोनेटर आणि रसायने यासह २,९०० किलो स्फोटक साहित्य जप्त केले होते. फरीदाबादमधील अल फला युनिव्हर्सिटी येथे कार्यरत असलेल्या डॉ. मुज्जम्मिल गनई आणि डॉ. शहीन सईद यांना अटक केली आहे. शहीन ही जेश-ए-मोहम्मदची महिला भरती प्रमुख असल्याचा आरोप आहे. तसेच विविध ठिकाणांहून अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. काशी आणि अयोध्या राम मंदिराला टार्गेट केले होते. ज्याचे एक मॉड्यूल तयार केले होते. अटक करण्यात आलेली शाहीन हिने अयोध्येत स्लीपर मॉड्यूल सक्रिय केले होते. हल्ला करण्यापूर्वीच अटक करण्यात आली. त्यांची स्फोटके जप्त करण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कौसा परिसरात केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे हे गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. येथील इब्राहिम अबीदी नावाच्या एका उर्दू शिक्षकाच्या घरावर बुधवारी एटीएसने छापा टाकला. अबीदी हा मुंब्र्यात भाड्याच्या घरात राहत असे आणि दर रविवारी कुर्ल्यातील एका मशिदीत उर्दू शिकवत असे. मात्र, या 'साध्या' जीवनाआड त्याचे संबंध अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी असल्याचा एटीएसला संशय आहे.