गेल्या आठवडाभरापासून डॉ. अनुष्का तिवारी आणि तिने केलेले हेअर ट्रान्सप्लांट प्रकरण खूप चर्चेत आले आहे. या हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर दोन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. आता अनुष्का हिच्या क्लिनिकमध्ये केस प्रत्यारोपण करणाऱ्या अनेकांनी समोर येत वेगवेगळे खुलासे करण्यास सुरुवात केली आहे. आता तिच्या क्लिनिकमध्ये उपचार घेतलेल्या रामजी सचान यांनी देखील आपबीती सांगितली आहे. या क्लिनिकमध्ये शस्त्रक्रिया केलेल्या काही लोकांच्या चेहऱ्यावर सूज आली तर, काहीना त्याचा संसर्ग देखील झाला होता.
ती मुलं कारागिरांसारखी होती!
रामजी सचान यांनी काही वर्षांपूर्वी त्याच क्लिनिकमधून केस प्रत्यारोपण करून घेतले होते. यासंबंधी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना रामजी सचान म्हणाले की, "माझे केस प्रत्यारोपण डॉ. अनुष्का यांनी नियुक्त केलेल्या तरुणांनी केले होते. ते तरुण एखाद्या कारखान्यातील कारागिरासारखे होते. त्यांचं काम बघून असं वाटत होतं की, त्या मुलांनी एखाद्या व्यावसायिक डॉक्टरकडे काम करून काही गोष्टी शिकून घेतल्या असाव्यात आणि नंतर ते अनुष्काच्या क्लिनिकमध्ये आले."
अनुष्का शस्त्रक्रियेदरम्यान फिरकलीही नाही!
रामजी सचान पुढे म्हणाले की, "डॉ.अनुष्का स्वतः शस्त्रक्रियेत सहभागी झाली नव्हती. ती फक्त औषधे लिहून देण्याचं काम करत होती. तिने माझ्या शस्त्रक्रियेला हातही लावला नाही. केस प्रत्यारोपणाचा निकालही समाधानकारक नव्हता. मी नाराजी व्यक्त केली, तेव्हा तिने सांगितले की, तुम्ही पुन्हा या, आपण पुन्हा प्रत्यारोपण करू. पण मला झालेल्या वेदना आणि भीतीनंतर, पुन्हा जाण्याचे धाडस माझ्यात नव्हते."
रामजी सचान म्हणाले की, "मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की,तिथून जिवंत परतलो. जेव्हा मला कळले की एकाच क्लिनिकमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे, तेव्हा मी आतून हादरलो." डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे नाव किंवा त्यांच्या पात्रतेचा किंवा पदवीचा कोणताही उल्लेख नसल्याचा आरोपही त्यांनी केला.