"ईशान्येतील लोक दिल्लीत सुरक्षित नाहीत"; भाजप खासदाराचा घरचा अहेर, संसदेत कायदा करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:44 IST2026-03-10T13:39:34+5:302026-03-10T13:44:21+5:30

दिल्लीत ईशान्येकडील नागरिकांवर झालेल्या हल्ल्यांमुळे भाजप नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Northeast People Not Safe in Delhi BJP MP Tapir Gao Slams Own Govt Demands Atrocity like Law | "ईशान्येतील लोक दिल्लीत सुरक्षित नाहीत"; भाजप खासदाराचा घरचा अहेर, संसदेत कायदा करण्याची मागणी

"ईशान्येतील लोक दिल्लीत सुरक्षित नाहीत"; भाजप खासदाराचा घरचा अहेर, संसदेत कायदा करण्याची मागणी

Arunachal Pradesh BJP MP Tapir Gao: देशाची राजधानी दिल्लीसह इतर महानगरांमध्ये ईशान्य भारतातील नागरिकांवर होणारे हल्ले आणि भेदभावाच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. अरुणाचल प्रदेशचे भाजप खासदार तापिर गाओ यांनी या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत स्वपक्षीय सरकारला घरचा अहेर दिला आहे. "ईशान्येतील लोक दिल्लीत सुरक्षित नाहीत," असे खळबळजनक विधान करत त्यांनी याप्रकरणी संसदेत आवाज उठवण्याचा आणि कठोर कायद्याची मागणी करण्याचा इशारा दिला आहे.

साकेत आणि मालवीय नगरमधील घटनांनी खळबळ

गेल्या काही दिवसांत दक्षिण दिल्लीत ईशान्य भारतीय महिलांसोबत झालेल्या दोन गंभीर घटनांमुळे संतापाची लाट पसरली आहे. रविवारी संध्याकाळी साकेत जिल्हा न्यायालयाजवळील एका उद्यानात मणिपूर आणि आसाममधील दोन महिला फिरत असताना काही पुरुषांनी त्यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. महिलांनी विरोध केला असता, आरोपींनी त्यांच्यावर हिंसक हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दुसऱ्या घटनेत काही दिवसांपूर्वीच मालवीय नगरमध्ये अरुणाचल प्रदेशातील तीन महिलांना त्यांच्या शेजाऱ्यांनी शिवीगाळ केली. एअर कंडिशनर बसवण्यावरून झालेल्या वादात या महिलांना वेश्याव्यवसाय करणाऱ्या किंवा मसाज पार्लर चालवणाऱ्या अशा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन हिणवण्यात आले.

आम्ही आमच्याच देशात असुरक्षित - तापिर गाओ

खासदार तापिर गाओ यांनी या घटनांचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले की, "केवळ दिल्लीतच नाही, तर देशातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये ईशान्येतील नागरिकांना भेदभावाचा, मारहाणीचा आणि कधीकधी हत्येचाही सामना करावा लागतो. ही एक मोठी समस्या असून आम्ही झिरो अवरमध्ये हा विषय मांडणार आहोत."


ईशान्य भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी ॲट्रॉसिटी ॲक्टसारखा स्वतंत्र आणि कठोर कायदा असावा अशी मागणी तापिर गाओ यांनी केली. ते केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन सुरक्षेच्या ठोस उपाययोजनांची मागणी करणार आहेत. महानगरांमध्ये राहणाऱ्या ईशान्येतील विद्यार्थ्यांच्या आणि नोकरी करणाऱ्यांच्या सुरक्षेची हमी मिळावी यासाठीही ते विनंती करणार आहेत.

हे न्यू नॉर्मल असू शकत नाही- मेघालयच्या मुख्यमंत्र्यांचा संताप

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी देखील या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, "मुख्य प्रवाहातील भारतात ईशान्येतील लोकांवर होणारे वारंवार हल्ले पाहून मला राग येतोय. मणिपूर आणि आसामच्या लोकांवर झालेला शारीरिक हल्ला अत्यंत घृणास्पद आहे. ही गुंडगिरी न्यू नॉर्मल असू शकत नाही."

वांशिक भेदभावाचे जुने दुखणे

ईशान्य भारतातील नागरिकांना त्यांच्या दिसण्यावरून, कपड्यांवरून किंवा खाण्याच्या सवयींवरून वारंवार लक्ष्य केले जाते. त्यांना बाहेरचे समजून हिणवण्याच्या घटना अनेक वर्षांपासून सुरू आहेत. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र, केवळ गुन्हे दाखल करून प्रश्न सुटणारा नसल्याने आता ठोस कायद्याची मागणी जोर धरू लागली आहे.
 

Web Title : पूर्वोत्तर के लोग दिल्ली में असुरक्षित: भाजपा सांसद ने संसद में कानून की मांग की

Web Summary : भाजपा सांसद तापिर गाओ ने दिल्ली में पूर्वोत्तर के लोगों के खिलाफ भेदभाव पर चिंता जताई। उत्पीड़न और हमले की हालिया घटनाओं के बाद सुरक्षा सुनिश्चित करने के लिए अत्याचार अधिनियम जैसे विशिष्ट कानून की मांग की गई। मेघालय के मुख्यमंत्री ने आक्रोश व्यक्त किया।

Web Title : Northeast People Unsafe in Delhi: BJP MP Demands Law in Parliament

Web Summary : BJP MP Tapir Gao raises concerns over discrimination against Northeast people in Delhi. Recent incidents of harassment and assault prompt calls for a specific law like the Atrocity Act to ensure their safety and security in major cities. Meghalaya CM expresses outrage.