काश्मीरसह उत्तर भारत गोठलेलाच; अनेक भागात जाेरदार बर्फवृष्टीमुळे कडाक्याची थंडी, देशात इतरत्र दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 09:43 IST2024-12-30T09:43:20+5:302024-12-30T09:43:48+5:30
उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही जाेरदार बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे पर्यटक आनंदी झाले आहेत. तर, राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात थंडीचा कडाका थोडा कमी झाला आहे.

काश्मीरसह उत्तर भारत गोठलेलाच; अनेक भागात जाेरदार बर्फवृष्टीमुळे कडाक्याची थंडी, देशात इतरत्र दिलासा
श्रीनगर/नवी दिल्ली : उत्तर भारतात सुरू असलेल्या थंडीचा कडाका रविवारी थाेडा कमी झाला असला तरी जम्मू-काश्मीरमध्ये मात्र अनेक भागांत तापमान शून्य अंशाच्या खाली असल्याने सामान्य जनजीवनावर याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, राजस्थानात काही भागांत हलका पाऊस होत असून अनेक भागांत दाट धुक्याचे साम्राज्य आहे.
उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही जाेरदार बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे पर्यटक आनंदी झाले आहेत. तर, राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात थंडीचा कडाका थोडा कमी झाला आहे. राजस्थानातील अनेक भागांत धुक्यामुळे दृष्यमानता ५० मीटर इतकी नोंदवली गेली. या धुक्यामुळे महामार्गांवर वाहतूक संथ सुरू होती. येत्या दोन दिवसांत राज्याच्या अनेक भागांत तापमान आणखी कमी होण्याचा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे.
श्रीनगरमध्ये विमान सेवा, महामार्ग पुन्हा सुरू
- श्रीनगरमध्ये हाेत असलेल्या हिमवृष्टीमुळे दोन दिवसांपासून बंद असलेली विमानसेवा रविवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सध्या येथील हवामान पाहता ही सेवा सुरळीतपणे सुरू राहील, अशी अपेक्षा विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.
- दरम्यान, काश्मीर खोऱ्याला देशाच्या इतर भागांशी जोडणारा श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग एक दिवस बंद ठेवल्यानंतर रविवारी
वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
‘चिल्ला-ए-कलां’च्या काळात वाढली थंडी
काश्मीर खोऱ्यात २१ डिसेंबर ते ३१ जानेवारी हा काळ ‘चिल्ला-ए-कलां’म्हणून ओळखला जातो. या काळात कडाक्याची थंडी असते. यानंतर २० दिवस ‘चिल्ला-ए-खुर्द’ आणि १० दिवस ‘चिल्ला-ए-बच्चा’ काळात कडाका कमी झाला तरी थंडीची लाट कायम राहणार आहे.
गुलमर्गमध्ये पारा शून्याच्या खाली ८ अंशावर
काश्मीरमध्ये प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या गुलमर्गमध्ये किमान तापमान उणे ८ अंश नोंदवले गेले, तर अमरनाथ यात्रा मार्गावरील प्रमुख ठिकाण असलेल्या पहलगाममध्ये तर तापमान उणे ८.५ अंशावर गेले आहे. श्रीनगरमध्ये रात्रीचे तापमान उणे ०.२ अंश होते.