होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 16:45 IST2026-04-05T16:45:10+5:302026-04-05T16:45:59+5:30
ऑइल इंडिया जैसलमेरमधील बागेवाला तेल क्षेत्रातून कच्चे तेल टँकरद्वारे गुजरातच्या मेहसाणा येथील ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ONGC) प्रकल्पांपर्यंत पोहोचवते

होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
अमेरिका इराण युद्धात स्ट्रेट होर्मुझ ठप्प झाल्याने जगात तेल आणि गॅसचं संकट उभे राहिले. पाकिस्तान, बांगलादेशसह व्हिएतनाम, ब्रिटनपर्यंत याचा परिणाम पाहायला मिळाला. भारतातही या युद्धाचे पडसाद जाणवले. परंतु सरकारने होर्मुझमुळे निर्माण झालेले टेन्शन दूर करण्यासाठी थार प्लॅन सक्रीय केला. होर्मुझ बंद झाल्यानं तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी भारताने राजस्थानच्या थार वाळवंटाकडे मोर्चा वळवला आणि तेथील तेल क्षेत्रांमधून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला.
दररोज विक्रमी तेल उत्पादन
पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठ्यात निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सरकारी मालकीच्या ऑइल इंडिया लिमिटेडने राजस्थानच्या थार वाळवंटातील आपल्या तेलक्षेत्रांमधून कच्च्या तेलाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, जोधपूर सँडस्टोन फॉर्मेशनमधून आता दररोज विक्रमी १,२०२ बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन होत आहे. गेल्या वर्षी येथील कच्च्या तेलाचे उत्पादन दररोज ७०५ बॅरल होते. जागतिक तेल संकटाच्या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन अंदाजे ७०% अधिक आहे.
ऑइल इंडिया जैसलमेरमधील बागेवाला तेल क्षेत्रातून कच्चे तेल टँकरद्वारे गुजरातच्या मेहसाणा येथील ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ONGC) प्रकल्पांपर्यंत पोहोचवते. तेथून हे कच्चे तेल पाइपलाइनद्वारे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोयाली रिफायनरीपर्यंत पोहोचवले जाते. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ऑइल इंडियाने राजस्थानमधील तेल क्षेत्रातून ४३,७७३ मेट्रिक टन कच्च्या तेलाचे उत्पादन केले. जे मागील वर्षीच्या ३२,७८७ मेट्रिक टनांपेक्षा जास्त आहे. कच्च्या तेलाच्या उत्पादनातील ही वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून भारतासह प्रमुख आशियाई बाजारपेठांना होणारा तेल पुरवठा रोखला आहे. तेल पुरवठा कायम ठेवण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. कच्च्या तेलाचा साठा बऱ्यापैकी आहे. देशभरात पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत आहे असं पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले.
१९९१ साली लागला तेल क्षेत्राचा शोध
बिकानेर-नागौर उपखोऱ्यात स्थित असलेले बागेवाला तेलक्षेत्र, हे भारतातील काही मोजक्या किनारपट्टीवरील तेलक्षेत्रांपैकी एक आहे. ऑइल इंडियाने १९ विहिरींमध्ये सीएसएस (CSS) कार्य पूर्ण केले, जे मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ७२% वाढ आहे. तसेच मागील नऊ विहिरींच्या तुलनेत १३ नवीन विहिरींचे खोदकामही केले. १९९१ मध्ये शोध लागलेले आणि २००.२६ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या थार तेलक्षेत्रात ५२ विहिरी असून त्यापैकी ३३ कार्यरत आहेत. ऑइल इंडियाने २०१८ मध्ये सर्वात आधी CSS तंत्रज्ञानाच्या प्रायोगिक चाचण्या घेतल्या. ज्यामुळे तेल क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर तेल काढणे शक्य झाले. मात्र येथील कच्च्या तेलाच्या जास्त चिकटपणामुळे कंपनीने उत्पादन कायम ठेवण्यासाठी डायल्यूएंट इंजेक्शन व आर्टिफिशियल लिफ्ट सिस्टीम यांसारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आणि २०१७ पासून बागेवाला क्षेत्रातून कच्च्या तेलाचे उत्पादन सुरू आहे.