हरयाणाच्या हिसार जिल्ह्यातील स्थानिक न्यायालयाने गुरुवारी युट्यूबर ज्योती मल्होत्राच्यापोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ केली. ज्योती मल्होत्राला १७ मे रोजी हिसारच्या न्यू अग्रवाल एक्सटेंशन भागातून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पाच दिवसांच्या रिमांड कालावधी पूर्ण झाल्यानंतर, ज्योतीला आज हिसार न्यायालयात हजर करण्यात आले, तिथे पोलिसांनी तिच्या कोठडीची मुदत वाढवण्याची विनंती केली. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य केली आणि ज्योतीची कोठडी २६ मे पर्यंत वाढवली.
३३ वर्षीय ज्योती मल्होत्रा तिच्या 'ट्रॅव्हल विथ ज्यो' या यूट्यूब चॅनलसाठी ओळखली जाते. तिच्यावर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी (ISI) हेरगिरी करण्याचा आणि संवेदनशील माहिती शेअर करण्याचा आरोप आहे. ज्योतीच्या यूट्यूब चॅनेलवर ३.७७ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर १.३१ लाख फॉलोअर्स आहेत.
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती २०२३ मध्ये व्हिसासाठी पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती, तिथे तिची भेट दानिश उर्फ एहसान-उर-रहीम या पाकिस्तानी अधिकाऱ्याशी झाली. त्यानंतर, तिने दानिशच्या माध्यमातून अली अहवान, शाकीर आणि राणा शाहबाज सारख्या इतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संपर्क केला.
हिसार पोलिसांचे प्रवक्ते विकास कुमार म्हणाले की, ज्योती हिच्यावर १९२३ च्या अधिकृत गुपिते कायदाच्या कलम ३ आणि ५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिच्या घरातून तीन मोबाईल फोन, एक लॅपटॉप, बँकेची कागदपत्रे आणि पासपोर्ट जप्त केले आहेत, जे फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत.
हिसार पोलिस, राष्ट्रीय तपास संस्था आणि गुप्तचर विभाग यांच्या संयुक्त पथकाकडून ज्योती मल्होत्राची चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतीने चौकशीदरम्यान कबूल केले आहे की ती २०२३ मध्ये दोनदा पाकिस्तानला गेली होती आणि तिथे तिची भेट दानिशच्या ओळखीच्या अली अहवानशी झाली होती, तिच्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली होती. हिसारचे पोलिस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी स्पष्ट केले की ज्योतीने संरक्षण किंवा धोरणात्मक माहिती सामायिक केल्याचे कोणतेही पुरावे अद्याप सापडलेले नाहीत. तसेच, त्याचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.