नितीश कुमार यांचं NDA मध्ये जाणं निश्चित, या तारखेला शपथविधी, सुशील मोदींकडे उपमुख्यमंत्रिपद?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 13:44 IST2024-01-26T13:44:12+5:302024-01-26T13:44:43+5:30
Bihar Politics Updates: बिहारच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. भाजपाशी असलेली आघाडी तोडून महाआघाडीत गेलेले नितीश कुमार परत एकदा माघारी फिरण्याच्या तयारीत असून, राज्यात नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचारी सुरू झाल्या आहेत.

नितीश कुमार यांचं NDA मध्ये जाणं निश्चित, या तारखेला शपथविधी, सुशील मोदींकडे उपमुख्यमंत्रिपद?
बिहारच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. भाजपाशी असलेली आघाडी तोडून महाआघाडीत गेलेले नितीश कुमार परत एकदा माघारी फिरण्याच्या तयारीत असून, राज्यात नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचारी सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार एनडीएसोबत सरकार स्थापन करणार असून, ते २८ जानेवारी रोजी ९ व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. त्यांच्यासोबत सुशील कुमार मोदी यांना उपमुख्यमंत्री बनवले जाण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने आपल्या सर्व आमदारांना पाटणामध्ये बोलावले आहेत. तसेच जेडीयूकडून सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. २८ जानेवारी रोजी पाटणामध्ये महाराणा प्रताप रॅली होती, ही रॅलीसुद्धा रद्द करण्यात आली आहे. तर भाजपाचे बिहारमधील सर्व प्रमुख नेते हे हायकमांडसोबत बैठकांवर बैठका घेत आहेत. एनडीएतील मित्रपक्षांच्या नेत्यांसोबतही चर्चा केली जात आहे.
भाजपा आणि नितीश कुमार यांच्यामध्ये डील फायनल झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. नितीश यांना पुन्हा सोबत घेण्यास भाजपा तयार आहे. तसेच दोन्ही पक्षांमध्ये नव्याने होत असलेल्या आघाडीबाबत वेगवेगळे फॉर्म्युले समोर येत आहेत. त्यातील एका फॉर्म्युल्यानुसार विधानसभा भंग केली जाण्याची शक्यता आहे. तसेच नितीश कुमार यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद देण्यासाठी भाजपा तयार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच हा फॉर्म्युल्या जवळपास मान्य झाल्याचेही सांगितले जात आहे.
भाजपामधील सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांच्याकडे नेतृत्व सोपवले जाऊ शकते. लोकसभा निवडणुकीपर्यंत नितीश कुमार यांच्याकडे नेतृत्व दिले जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वत: भाजपाकडून संपूर्ण मोहिमेमध्ये गुंतले आहेत. या मुद्द्यावर गुरुवारी रात्री अमित शाह यांची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा झाली. तसेच नड्डा यांनी आपला केरळ दौराही रद्द केला आहे. जीतनराम मांझी आणि चिराग पासवान या आपल्या सहकाऱ्यांसोबतही भाजपा सातत्याने चर्चा करत आहे.