नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 19:26 IST2025-11-16T19:25:57+5:302025-11-16T19:26:45+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आता सरकार स्थापनेच्या अंतिम टप्प्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या ...

नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आता सरकार स्थापनेच्या अंतिम टप्प्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार हे पहिल्या टप्प्यात अत्यंत महत्त्वाच्या आणि विश्वासू नेत्यांचा समावेश असलेले १८ मंत्र्यांचे लहान मंत्रिमंडळ स्थापन करण्याची शक्यता आहे. परंतू, मुख्यमंत्री कोण होणार यावर मात्र सस्पेन्स राखण्यात आला आहे.
पक्षांमध्ये मंत्रिपदाचे वाटप निश्चित झाले असून, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजप आणि जेडीयूने समान समतोल राखण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. पहिल्या टप्प्यात जेडीयू आणि भाजपमधून जवळपास समान संख्येने मंत्रिपदे दिली जाण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना महत्त्वपूर्ण खाती मिळतील. या १८ मंत्र्यांमध्ये दलित, ओबीसी, ईबीसी आणि उच्चवर्णीय अशा सर्व समाज घटकांना प्रतिनिधीत्व देण्यावर एनडीएचा विशेष भर राहणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा समतोल महत्त्वाचा मानला जात आहे.
मंत्रिमंडळात तरुण आणि नव्या चेहऱ्यांसोबतच नितीश कुमार यांच्यासोबत अनेक वर्षे काम केलेल्या अनुभवी नेत्यांनाही स्थान दिले जाईल. हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी यांसारख्या लहान मित्रपक्षांनाही त्यांच्या आमदारांच्या संख्येनुसार एक किंवा दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.
संभाव्य महत्त्वाचे चेहरे
सूत्रांनुसार, पहिल्या टप्प्यातील संभाव्य १८ नावांमध्ये भाजप आणि जेडीयूच्या काही प्रमुख नेत्यांची नावे निश्चित मानली जात आहेत. बिहारच्या प्रशासकीय आणि राजकीय स्थैर्यासाठी ही १८ नावे महत्त्वाची असतील. शपथविधी समारंभ लवकरच होण्याची शक्यता असून, त्यापूर्वी या यादीला अंतिम रूप दिले जाईल.