नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 08:36 IST2025-10-18T08:35:42+5:302025-10-18T08:36:30+5:30
राष्ट्रीय जनता दलावर (राजद) हल्लाबोल करताना शाह यांनी राजदचे दिवंगत बाहुबली नेते मोहम्मद शहाबुद्दीन यांचा मुलगा ओसामा शहाब याला उमेदवारी दिल्याबद्दल तीव्र टीका केली.

नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सारण जिल्ह्यात तरय्या विधानसभा मतदारसंघातील मंझोपूर येथे जाहीर सभा घेत, या निवडणुकीतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडला. नितीशकुमार यांनी गेल्या २० वर्षांत राज्याला ‘जंगलराज’मधून मुक्त केल्याचे सांगून आगामी निवडणुकीतही एनडीए ऐतिहासिक विजयासह सरकार स्थापन करील, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय जनता दलावर (राजद) हल्लाबोल करताना शाह यांनी राजदचे दिवंगत बाहुबली नेते मोहम्मद शहाबुद्दीन यांचा मुलगा ओसामा शहाब याला उमेदवारी दिल्याबद्दल तीव्र टीका केली. यातून बिहार सुरक्षित राहील का, असा प्रश्न उपस्थित करून शाह यांनी राजद अजूनही गुंडगिरी व गुन्हेगारीच्या राजकारणाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मैथिली ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांनी शुक्रवारी अलीनगर मतदारसंघातून भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. बिहारच्या जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याचे नमूद करून मैथिली यांनी अलीनगर हे आजोळ असल्याचे सांगितले.
...असा बदलला बिहार
एनडीए सरकार राज्यात स्थापन होण्यापूर्वी येथे रोजगारासाठी स्थलांतर, खंडणी, अपहरण व हत्या, असे प्रकार रोजचेच होते. एनडीए सरकारने येथे अनेक अभियांत्रिकी, मेडिकल कॉलेज सुरू केले, असे शाह म्हणाले.
नितीशकुमार यांचेच नेतृत्व
भाजप आघाडी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढवीत असल्याचे नमूद करून एनडीए पूर्ण बहुमताने राज्यात सरकार स्थापन करील, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. उपस्थित जनसमुदायाला उद्देशून शाह यांनी विचारले, ‘तुम्हाला विकास हवा की जंगलराज?’ यावर लोकांनी एका आवाजात उत्तर दिले, ‘विकास.’
घराणेशाही नाकारा, कामगिरी पाहा
पाटणा येथे बुद्धिजीवींच्या एका संमेलनात बोलताना अमित शाह यांनी लोकांनी घराणेशाहीचे राजकारण नाकारून कामगिरी करणाऱ्यांना निवडून द्या, असे आवाहन केले.