नितीश कुमार यांनी ज्येष्ठ नेत्याला दिला पक्षातून नारळ, जेडीयू म्हणाली, आता आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 15:04 IST2026-01-10T15:03:10+5:302026-01-10T15:04:35+5:30
K. C. Tyagi News: केंद्रातील एनडीएस सरकारमधील मुख्य भागीदार आणि बिहारमधील सत्ताधारी असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाने एक मोठा निर्णय घेताना पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी यांना पक्षातून नारळ दिला आहे.

नितीश कुमार यांनी ज्येष्ठ नेत्याला दिला पक्षातून नारळ, जेडीयू म्हणाली, आता आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही
केंद्रातील एनडीएस सरकारमधील मुख्य भागीदार आणि बिहारमधील सत्ताधारी असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाने एक मोठा निर्णय घेताना पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी यांना पक्षातून नारळ दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये के. सी. त्यागी यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे पक्षात असंतोष निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. दरम्यान, के. सी. त्यागी यांचा जनता दल युनायटेड पक्षातील अध्याय आता संपुष्टात आला असल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. हल्लीच बांगलादेशी क्रिकेटपटूंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार के.सी. त्यागी यांनी गेल्या काही काळापासून पक्षाच्या अधिकृत भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका पांडण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर जेडीयूने त्यांच्यापासून अंतर बाळगण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाचे प्रवक्ते राजीव रंजन यांच्या हल्लीच्या वक्तव्यांमुळे जेडीयूचा आता के. सी. त्यागी यांच्यासोबत कुठलाही औपचारिक संबंध राहिलेला नाही, हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे.
के. सी. त्यागी यांनी हल्लीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारतरत्न सन्मान देण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिलं होतं. गतवर्षी चौधरी चरण सिंह आणि कर्पुरी ठाकूर यांना ज्याप्रमाणे भारतरत्न सन्मानाने सन्मानित करण्यात आलं, त्याचप्रमाणे नितीश कुमार हे सुद्धा या सन्मानासाठी पूर्ण हक्कदार आहेत, असा दावा त्यांनी केला होता. मात्र जेडीयूने या मागणीपासून स्वत:ला दूर ठेवले होते.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार के. सी. त्यागी आणि जेडीयू यांनी सन्मानपूर्वक आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यागी यांचे पक्षासोबत असलेले दीर्घकालीन संबंध पाहता पक्षनेतृत्वाने त्यांच्याविरोधात कुठलीही औपचारिक अनुशासनात्मक कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. के. सी. त्यागी यांनी पक्षामध्ये अनेक महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्व त्यांच्यासोबत कुठलेही मतभेद निर्माण करू इच्छित नाही. मात्र के. सी. त्यागी आता जेडीयूचं धोरण, निर्णय आणि अधिकृत भूमिकांबाबत प्रतिनिधित्व करणार नाही, असेही पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे.