"अरे, कुठे चाललात... कार्यक्रम बंद करू का?" भरसभेत महिलांवर संतापले नितीश कुमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 11:51 IST2026-03-15T11:50:47+5:302026-03-15T11:51:03+5:30
Nitish Kumar : नितीश कुमार हे अनेकदा त्यांच्या विधानांमुळे आणि खास शैलीमुळे चर्चेत असतात

"अरे, कुठे चाललात... कार्यक्रम बंद करू का?" भरसभेत महिलांवर संतापले नितीश कुमार
नितीश कुमार हे अनेकदा त्यांच्या विधानांमुळे आणि खास शैलीमुळे चर्चेत असतात. बेगूसराय येथील त्यांच्या एका विधानाने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून कार्यक्रमादरम्यान घडलेली ही घटना आता चर्चेचा विषय बनली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार भाषण देत असतानाच काही महिला कार्यक्रम सोडून मधूनच उठून जाऊ लागल्या. हे पाहून मुख्यमंत्री संतापले आणि त्यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली.
जाणाऱ्या महिलांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, "अरे, कुठे चाललात? मी कार्यक्रम बंद करू का? मी पाहत होतो की आधीही तिकडून लोक जात होते. जर सगळेच असे निघून गेले, तर आम्हीही (भाषण) सोडून देऊ. शांत बसून ऐका. इथे सर्व काही सांगितलं जात आहे, मग एवढी घाई कशाची? आधी पूर्ण गोष्ट जाणून घ्या."
नितीश कुमार शनिवारी त्यांच्या 'समृद्धी यात्रे'च्या निमित्ताने बेगूसराय येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी सुमारे ३७६ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. बरौनी ब्लॉकमधील बियाडा संकुलात आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री केवळ त्यांच्या विधानामुळेच नव्हे, तर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याबद्दल दाखवलेल्या प्रेमामुळेही चर्चेत राहिले.
भाषण संपल्यानंतर त्यांनी उपस्थितांना विनंती केली की, "जरा एक मिनिट थांबा." त्यानंतर ते पुढे गेले आणि सम्राट चौधरी यांच्या जवळ पोहोचले, त्यांचा हात धरला आणि दोघांनी मिळून जनतेला अभिवादन केलं. मुख्यमंत्र्यांच्या या वागणुकीमुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या. काही जण याला सम्राट चौधरींबद्दलचा त्यांचा विशेष जिव्हाळा मानत आहेत, तर काही जण भविष्यातील राजकारणाशी जोडून तर्कवितर्क लावत आहेत.