भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:19 IST2025-12-14T17:18:50+5:302025-12-14T17:19:48+5:30
नितीन नबीन सध्या बिहार सरकारमध्ये मंत्री आहेत.

भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
BJP: भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती 14 डिसेंबर 2025 पासून तात्काळ लागू झाली असून, बिहारसह राष्ट्रीय राजकारणात भाजपची रणनीती अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
संसदीय बोर्डाचा निर्णय, औपचारिक आदेश जारी
या नियुक्तीबाबत भाजपकडून अधिकृत संघटनात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव व मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ही नियुक्ती भाजपच्या संसदीय बोर्डाने केली आहे. आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, सध्या बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले नितीन नबीन आता राष्ट्रीय स्तरावर संघटनेची महत्त्वाची जबाबदारी सांभाळतील.
Bihar Minister Nitin Nabin appointed as the National Working President of the Bharatiya Janata Party pic.twitter.com/zvo7aUNvX9
— ANI (@ANI) December 14, 2025
सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
पक्ष नेतृत्वाने नितीन नबीन यांचा संघटनात्मक अनुभव, स्थानिक पकड आणि प्रशासकीय क्षमता लक्षात घेऊन ही जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे, याआधी जेपी नड्डा यांनाही राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यापूर्वी कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती, त्यामुळे नबीन यांच्या नियुक्तीकडे भविष्यातील मोठ्या भूमिकेचा संकेत म्हणून पाहिले जात आहे.
सध्याची जबाबदारी आणि राजकीय प्रवास
नितीन नबीन सध्या बिहारमधील नितीश कुमार सरकारमध्ये रस्ते बांधकाम मंत्री आहेत. ते पाटणा येथील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. कायस्थ समाजातून येणारे नबीन हे भाजपचे ज्येष्ठ नेते नवीन किशोर सिन्हा यांचे पुत्र असून, विद्यार्थी राजकारणापासून संघटनेतील विविध पदांपर्यंत त्यांनी प्रदीर्घ प्रवास केला आहे.
शिस्तबद्ध संघटक अशी ओळख
भाजपमध्ये नितीन नबीन यांची ओळख शिस्तप्रिय संघटक आणि जलद निर्णय घेणारे नेता अशी आहे. बिहार भाजपमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, राज्यातील संघटना मजबूत करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.