"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 13:49 IST2025-08-10T13:47:39+5:302025-08-10T13:49:58+5:30
Nitin Gadkari on India US Relations : "भारत कुणावर दादागिरी करत नाही, कारण आपली ती संस्कृती नाही," असेही गडकरी म्हणाले

"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
Nitin Gadkari on India US Relations : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील कर अचानक वाढवल्याने, गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. तशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (व्हीएनआयटी) आपल्या भाषणात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगतानाच, निर्यात वाढवण्याची गरज असण्यावरही भर दिला. आज दादागिरी करणारे देश हे आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्याने आणि त्यांच्याकडे नवीन तंत्रज्ञान असल्याने ते असे करू शकतात, असे गडकरी म्हणाले. भारताने निर्यात वाढवण्यावर आणि आयात कमी करण्याच्या गरजेवर गडकरी यांनी भर दिला. जर आपल्याला भारताला 'विश्वगुरू' बनवायचे असेल, तर निर्यात वाढवणे आणि आयात कमी करणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे, असे गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले.
आर्थिकदृष्ट्या सक्षम देश गुंडगिरी करताहेत...
"जर आपला निर्यात दर आणि अर्थव्यवस्थेचा दर वाढला, तर आपल्याला कोणापुढे हात पसरायची जाण्याची गरज भासणार नाही. जे देश दादागिरी करत आहेत, ते असे करत आहेत, कारण ते आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत आणि त्यांच्याकडे अत्यधुनिक तंत्रज्ञान आहे. आपल्याला चांगले तंत्रज्ञान आणि संसाधने मिळाली तरी आपण कोणावर दादागिरी करणार नाही, कारण आपली संस्कृती आपल्याला शिकवते की जगाचे कल्याण सर्वात महत्वाचे आहे," असे गडकरी म्हणाले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान हे सर्व समस्यांवर उपाय
गडकरी म्हणाले, "जागतिक स्तरावर आपल्याला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, या सर्व समस्यांवर विज्ञान आणि तंत्रज्ञान हाच उपाय आहे. हे सारे ज्ञान तर आहेच, पण त्यातून शक्ती आणि सामर्थ्यही मिळेल, जे आपल्याला या समस्येतून बाहेर पडण्यास मदत करेल."
निर्यात वाढवणे आणि आयात कमी करणे आवश्यक
"आपल्याला भारताला 'विश्वगुरू' बनवायचे असेल तर निर्यात वाढवणे आणि आयात कमी करणे खूप महत्वाचे आहे. संशोधन संस्था, आयआयटी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनी देशाच्या गरजा लक्षात घेऊन संशोधन करावे. इतर क्षेत्रातील संशोधन देखील तितकेच महत्त्वाचे आहे," असे रोखठोक विधान त्यांनी केले.